आजपासून काँग्रेस-राकॉची संयुक्त किसान संघर्ष यात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2017 12:26 AM2017-03-28T00:26:01+5:302017-03-28T00:26:01+5:30
शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचे आश्वासन देवूनही प्रत्यक्षात मात्र त्याकडे पाठ फिरविणाऱ्या राज्यातील भाजपा सरकारच्या विरोधात विरोधक एकत्रित आले आहेत.
कर्जमुक्तीसाठी पाऊल : ९२ विरोधी आमदारांचा सहभाग
चंद्रपूर : शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचे आश्वासन देवूनही प्रत्यक्षात मात्र त्याकडे पाठ फिरविणाऱ्या राज्यातील भाजपा सरकारच्या विरोधात विरोधक एकत्रित आले आहेत. याचा निषेध व्यक्त करण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रसने संयुक्त किसान संघर्ष यात्रा काढण्याचे ठरविले असून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अर्थात २९ मार्चला सिंदेवाही तालुक्यातील पळसगाव जाठ येथून ही यात्रा निघणार आहे.
सहा दिवसांची ही संघर्ष यात्रा विदर्भात फिरून पनवेल येथे समाप्त होणार आहे. यात्रेचा हा पहिला टप्पा असून यात काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रस पार्टी, शेतकरी कामगार पक्ष, रिपाई मिळून एकूण ९२ आमदार सहभागी होत असल्याची माहिती विधानसभेतील काँग्रसचे उप गटनेते तथा आमदार विजय वड़ेट्टीवार यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, या यात्रेत माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राकाँ नेते धनंजय मुंडे, अजित पवार, सुनील तटकरे आदी प्रामुख्याने सहभागी होणार आहेत. तीन टप्प्यात सहा-सहा दिवसांची ही संर्घष यात्रा राहणार असून राज्यातील १५० विधानसभा क्षेत्रात फिरून शेतकऱ्यांच्या भेटी घेणार आहे. या दरम्यान राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी भूमिकेवर ही मंडळी प्रकाश टाकणार आहेत. पहिल्या टप्प्यात चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, गोंदिया, नागपूर, अमरावती आदी जिल्ह्यातून ही संघर्ष यात्रा जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात सिंधुदुर्ग येथून या यात्रेला प्रारंभ होणार आहे.
सरकारवर टीका करताना आमदार वडेट्टीवार म्हणाले, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ म्हणणारे सरकार आता आपल्या भूमिकेपासून माघारले. त्याचा निषेध करणाऱ्या आमदारांना निलंबित करून आवाज दडपण्याचा प्रयत्न सरकारने केला. विरोधी बाकावर असताना विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार विरोधी बाकावर असताना त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी एक लाख स्वाक्षऱ्यांचे निवेदन सरकारला पाठविले होते. आता ही मंडळी सरकारात असताना आपली भूमिका का विसरत आहेत, असा टोलाही त्यांनी मारला. पत्रकार परिषदेला माजी आमदार सुभाष धोटे, जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, आसावरी देवतळे, रजनी हजारे आदी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)