आज वाजणार शाळेची पहिली घंटा

By admin | Published: June 27, 2017 12:43 AM2017-06-27T00:43:15+5:302017-06-27T00:43:15+5:30

दोन महिन्यांच्या उन्हाळी सुट्या संपल्या असून २७ जून मंगळवारला शाळेची पहिली घंटा वाजणार आहे.

Today is the first hour of school | आज वाजणार शाळेची पहिली घंटा

आज वाजणार शाळेची पहिली घंटा

Next

नवागतांच्या स्वागताची जय्यत तयारी : विद्यार्थ्यांचा किलबिलाट होणार सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : दोन महिन्यांच्या उन्हाळी सुट्या संपल्या असून २७ जून मंगळवारला शाळेची पहिली घंटा वाजणार आहे. शिक्षण विभागाने नवागतांच्या स्वागताची तयारी पूर्ण केली असून शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा करण्याचे निर्देश सर्व शाळांना दिले आहेत. पहिल्याच दिवशी सर्व दाखलपात्र विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वाटप करण्यात येणार असून लोकप्रतिनिधी, अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व शिक्षक नवगत विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करणार आहेत.
जिल्हा परिषद अंतर्गत जिल्ह्यात १ हजार ५६४ प्राथमिक शाळा आहेत. तर ७० खासगी प्राथमिक शाळा व ४९८ माध्यमिक शाळा आहेत. पहिल्याच दिवशी १ हजार ५६४ प्राथमिक शाळांमध्ये जवळपास ३३ हजारच्या आसपास विद्यार्थी दाखल होणार आहेत. शाळेचा पहिला दिवस पुस्तक दिन म्हणून साजरा करण्याचे सर्व शाळांना निर्देश देण्यात आले असून या कार्यक्रमाला क्षेत्रीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. तसेच पहिल्या दिवशी गावात प्रभात फेरी, शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पाठ्यपुस्तकांचे वाटप, पहिल्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याला फुल देऊन स्वागत, शालेय पोषण आहारात गोड पदार्थ जेवू घालणे असे कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. याबाबत सर्व शाळांनी नियोजन केल्याची माहिती, प्राथमिक शिक्षण विभागाने दिली आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांत शिक्षणाविषयी आवड निर्माण व्हावी व तो नियमीत शाळेत यावा, यासाठी शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्याचा अविस्मरणीय क्षण राहील, याची काळजी घेण्यात शिक्षण विभाग व्यस्त आहे. शिक्षण विभागासह इतर विभागातील वर्ग २ व त्यावरील अधिकाऱ्यांना प्रवेशोत्सवासाठी निमंत्रित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमादरम्यान सर्व शाळांतील शिक्षकांना वर्षभर करायच्या कामांचा संकल्प करायचा असून १०० टक्के पटनोंदणी व दर्जेदार शिक्षणाचा निर्धार करण्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत.

सर्व विषयांची
पुस्तके पोहोचली
जिल्हा परिषदेच्या तसेच खासगी शाळेतील पहिली ते सातवीपर्यंतच्या सर्वच विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तके वाटप केली जाणार आहे. यासाठी शिक्षण विभागाने सर्व पंचायत समित्यांना पुस्तके पाठविली असून केवळ तेलगू माध्यमाच्या सातव्या वर्गाचे विज्ञान विषयाचे पुस्तक अद्याप पोहोचलेले नाही. उर्वरीत सर्व विषयांची पुस्तके पोहचली असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली.

शैक्षणिक साहित्यांची दुकाने सजली
शाळा सुरू होण्याच्या तोंडावर चंद्रपूरसह अनेक शहर व ग्रामीण भागातही शैक्षणिक साहित्याने दुकाने सजली आहेत. पाठ्यपुस्तके, दफ्तर, स्टडी टेबल असे विविध साहित्य विक्रीचे दुकान लागले असून चंद्रपुरात अनेक मार्गावर रस्त्यावरच दुकाने लागलेली आहेत. पावसाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांचे पालक छत्री, रेणकोट अशा साहित्याचीही खरेदी करीत आहेत.

प्रवोशोत्सवाची तयारी पूर्ण झाली असून सर्व शाळांमध्ये दाखलपात्र विद्यार्थ्यांचे स्वागत केले जाणार आहे. पहिल्याच दिवशी सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके मिळणार असून या कार्यक्रमाला स्थानिक लोकप्रतिनिधी व गावातील प्रतिष्ठित नागरिकांना आमंत्रित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
- राम गारकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि.प., चंद्रपूर.

Web Title: Today is the first hour of school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.