आजपासून चंद्रपुरात ‘क्रांतीकथा’ व्याख्यानमाला
By admin | Published: January 10, 2015 10:52 PM2015-01-10T22:52:18+5:302015-01-10T22:52:18+5:30
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय संस्था चंद्रपूरच्यावतीने युगपुरूष स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून ११ ते १४ जानेवारीदरम्यान ४ दिवसीय ‘क्रांतीकथा’ व्याख्यानमालेचे
चंद्रपूर : डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय संस्था चंद्रपूरच्यावतीने युगपुरूष स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून ११ ते १४ जानेवारीदरम्यान ४ दिवसीय ‘क्रांतीकथा’ व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. सच्चिदानंद शेवडे यांच्या ओजस्वी वाणीतून साकारणाऱ्या या व्याख्यानमालेत क्रांतीकारकांची समरगाथा मांडण्यात येणार आहे.
स्थानिक प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात सायंकाळी ६ ते ९ वाजता आयोजित करण्यात आलेल्या या व्याख्यानमालेत ११ जानेवारी रोजी वासुदेव बळवंत फडके, १२ जानेवारी रोजी चाफेकर बंधू, १३ जानेवारी रोजी मदनलाल धिंग्रा आणि १४ जानेवारी रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची क्रांतीकथा डॉ. शेवडे मांडणार आहे.
चार दिवस चालणाऱ्या या क्रांतीकथा व्याख्यानमालेला डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय संस्थेचे अध्यक्ष तथा राज्याचे अर्थ व नियोजन, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित राहणार आहेत.
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय संस्थेतर्फे आयोजित या व्याख्यानमालेचे हे तिसरे वर्ष आहे. युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात येत आहे. पहिल्या वर्षी नरेंद्र ते विवेकानंद, दुसऱ्या वर्षी विवेकानंदांच्या सार्द्धशती समारोहानिमित्त हुतात्मा भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, स्वातंत्र्यवीर सावरकर या विषयावर तर यावर्षी क्रांतीकथा व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. सार्द्धशती समारोहानिमित्त विविध कार्यक्रम आम्ही आयोजित केले. बल्लारपूर येथे योद्धा सन्यासी विवेकानंद हे एक दिवसीय व्याख्यान, सुप्रसिद्ध संगीतकार श्रीधर फडके यांचा ‘फिटे अंधाराचे जाळे’ हा सांगीतिक कार्यक्रम, ऊर्जानगर येथे पं. हृदयनाथ मंगेशकर आणि डॉ. सलिल कुलकर्णी यांचा ‘मैत्र जीवांचे’ हा कार्यक्रम यासह अनेक सेवाभावी उपक्रम वर्षभर राबविण्यात आले. आता सन २०१५ मध्ये क्रांतीकथा व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे.
या व्याख्यानमालेला चंद्रपूरकर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)