आज ३ लाख मतदार ठरविणार उमेदवारांचे भाग्य

By admin | Published: April 19, 2017 12:36 AM2017-04-19T00:36:59+5:302017-04-19T00:36:59+5:30

या महानगरपालिकेच्या बुधवारी होणाऱ्या दुसऱ्या सर्वसाधारण निवडणुकीसाठी पोलिंग पार्ट्या मंगळवारी मतदान केंद्रांवर पोहोचल्या.

Today, the luck of the candidates who will decide 3 lakh voters | आज ३ लाख मतदार ठरविणार उमेदवारांचे भाग्य

आज ३ लाख मतदार ठरविणार उमेदवारांचे भाग्य

Next

३६७ मतदानकेंद्रे : पोलिंग पार्ट्या पोहोचल्या, एस.टी.-स्कूल बसची मदत
चंद्रपूर : या महानगरपालिकेच्या बुधवारी होणाऱ्या दुसऱ्या सर्वसाधारण निवडणुकीसाठी पोलिंग पार्ट्या मंगळवारी मतदान केंद्रांवर पोहोचल्या. पोलिंग पार्ट्या दुपारी १२ वाजतापासून राज्य परिवहन महामंडळाच्या ३२ बसेस आणि ८ स्कूल बसमधून केंद्रावर गेले. मतदान करण्यासाठी १८३५ अधिकारी-कर्मचारी सज्ज झाले आहेत. ३ लाख मतदार ४६० उमेदवारांचे भाग्य ठरविणार आहेत. दरम्यान, काँग्रेसने मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी सोमवारी केली.
महानगरपालिकेच्या ६६ जागांसाठी ४६० उमेदवार रिंगणात आहेत. सर्वच पक्षांनी प्रचारामध्ये जीव ओतला होता. त्यात प्रमुख लढत सत्ताधारी भाजप, काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या उमेदवारांमध्ये होत आहे. काही वार्डांमध्ये बसपा, रिपाइं, प्रहार, अपक्ष असे लहान उमेदवार पाचवा कोन बनविण्याच्या स्थितीत आहेत. नऊ दिवस चाललेला प्रचार सोमवारी सायंकाळी बंद झाला. त्यानंतर दोन रात्रीमध्ये उमेदवारांनी द्वार भेटी व गुप्त बैठकांवर जोर दिला.
प्रचारासाठी भाजप व काँग्रेस वगळता इतर पक्षांचे कोणतेही मोठे नेते आपापल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आले नाहीत. भाजपच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक सभा घेतली. उर्वरित संपूर्ण प्रचाराची धुरा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी सांभाळली. काँग्रेसच्या प्रचारासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांची सभा झाली. माजी खासदार माजी खा. नरेश पुगलिया यांनी काँग्रेस उमेदवारांची बाजू सांभाळली. इतर पक्षांच्या उमेदवारांना स्वबळावर ही निवडणूक लढवावी लागत आहेत. त्यामुळे त्यांना अधिक ताकद लावावी लागत आहे.
प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांना काही अपक्ष जोरदार टक्कर देण्याच्या स्थितीत आहेत. त्यामुळे त्यांना नावांचा बोलबाला आहे. प्रत्यक्षात मतदारराजा कोणाच्या झोळीत आपले दान टाकतो, त्यावर सर्वकाही अवलंबून आहे. (प्रतिनिधी)

२६ केंद्र संवेदनशील
मनपा क्षेत्रात निवडणुकीसाठी ३६७ मतदान केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. त्यापैकी २६ मतदान केंद्र संवेदनशील समजले जात आहेत. संवेदनशील मतदान केंद्रांवर लक्ष ठेवण्यासाठी पाच भरारी पथके तयार करण्यात आली आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर एक केंद्राधिकारी धरून चार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच त्यांच्या मदतीला पोलीसदेखील आहेत. त्यामुळे १८३५ अधिकारी-कर्मचारी मतदान केंद्रावर तैनात करण्यात आले आहेत. शहरातील मतदान केंद्रावर बुधवारी ३ लाख २ हजार ५७ मतदार आपला हक्क बजावणार आहेत. मतदानानंतर सायंकाळी बॅलेट युनिट जिल्हा स्टेडियम येथील कंट्रोल रुममध्ये सीलबंद करण्यात येणार आहेत.

मतदानासाठी
१२५८ बॅलेट युनिट
मतदान करण्यासाठी १ हजार २५८ बॅलेट युनिक आणि ४४० कंट्रोल युनिटचा वापर केला जाणार आहे. मतदानात समन्वय करण्यासाठी ३४ झोन अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. १० टक्के मतदान पथके राखीव ठेवण्यात आली आहेत.मतदान केंद्रांवर पोलिंग पार्ट्या पोहोचविण्याकरिता राज्य परिवहन महामंडळाच्या मोठ्या २६ बसेस आणि लहान ६ बसेस तसेच खासगी शाळेच्या ८ स्कूल बसचा उपयोग करण्यात आला.

मतदान केंद्रावर सीसीटीव्ही
कॅमेरे लावण्याची मागणी
शहर काँग्रेसचे अध्यक्ष गजानन गावंडे यांनी मनपा निवडणुकीचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना निवेदन सादर करून प्रत्येक मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी केली आहे. निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे मतदान केंद्रांवर कार्यान्वित सीसीटीव्ही कॅमेरे लावणे आवश्यक व बंधनकारक आहे. मतदानाच्या दिवशी सकाळी ६.३० वाजतापासून सायनकाळी मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ते कॅमेरे कार्यान्वित केले पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

दिव्यांगासाठी रुग्ण
वाहिका व व्हिलचेअर
मतदानासाठी आवश्यकतेनुसार दिव्यांग मतदार नागरिकांना मतदान केंद्रावर ने-आण करण्यासाठी चंद्रपूर मनपातर्फे रुग्ण वाहिका व व्हिल चेअरची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. ही सेवा फक्त दिव्यांग मतदारांकरीताच असेल या सेवेचा लाभ घेण्यासाठी पुढील अधिकारी नियुक्त केले असून त्यांच्यापुढे नमुद केलेल्या प्रभागांसाठीच त्यांना दूरध्वनी करावा असे आवाहन महानगरपालिकेच्या मुख्य आरोग्य अधिकारी डॉ.अंजली आंबटकर यांनी केले आहे.

Web Title: Today, the luck of the candidates who will decide 3 lakh voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.