आज चोख बंदोबस्त, ५०० पोलीस तैनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 11:14 PM2019-05-22T23:14:45+5:302019-05-22T23:15:18+5:30
चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राच्या निवडणुकीचा निकाल गुरुवारी एमआयडीसी दाताळा परिसरातील वखार महामंडळाच्या गोदामामध्ये होणार आहे. निकालादरम्यान कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये म्हणून चंद्रपूर पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे.
चंद्रपूर : चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राच्या निवडणुकीचा निकाल गुरुवारी एमआयडीसी दाताळा परिसरातील वखार महामंडळाच्या गोदामामध्ये होणार आहे. निकालादरम्यान कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये म्हणून चंद्रपूर पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनात ५०० पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला आहे.
चंद्रपूर लोकसभा क्षेत्र संवेदनशील क्षेत्र म्हणून ओळखले जाते. तसेच या क्षेत्रात स्थानिक राजकीय नेते मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे या क्षेत्रातील निवडणूक ही अत्यंत चुरशीची होत असते. बुधवारी सायंकाळपासूनच विविध विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्ते चंद्रपुरात दाखल झाले आहे. त्यामुळे निकाल परिसर केंद्रात कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी राहणार असल्याने पोलीस प्रशासनाने ५०० पोलिसांचा ताफा सज्ज केला आहे. यामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, चार उपविभागीय पोलीस अधीकारी, दहा पोलीस निरिक्षक, ८० पोलीस उपनिरिक्षक व सहाय्यक पोलीस निरिक्षक, १०० महिला पोलीस कर्मचारी, ३०० पुरुष पोलीस कर्मचारी बुधवारपासूनच तैनात करण्यात आले आहे.
मतमोजणी केंद्रावरील सर्व घडामोडींवर पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी व अप्पर पोलीस अधीक्षक हे स्वत: लक्ष ठेऊन राहणार आहेत. यासोबत सीआरपीएफचे जवान निवडणुकीच्या दिवशीपासून एमआयडीसी वखार महामंडळाच्या परिसरात तैनात आहेत.
चौकाचौकात पोलीस बंदोबस्त
निकालादरम्यान राजकीय पक्षाच्या कार्यालयात मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमा होत असतात. तसेच रस्त्यावरसुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्यामुळे चौकाचौकात पोलिसांनी बॅरिकेट्स लावले असून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.