आज विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे धरणे
By admin | Published: January 7, 2017 12:44 AM2017-01-07T00:44:03+5:302017-01-07T00:44:03+5:30
खाजगी व स्थानिक संस्था अंतर्गत माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, खाजगी आश्रमशाळा शिक्षक-शिक्षकेत्तर ...
केंद्रीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन द्या
चंद्रपूर : खाजगी व स्थानिक संस्था अंतर्गत माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, खाजगी आश्रमशाळा शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या प्रलंबीत मागण्या व समस्या निवारणार्थ विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे निदर्शने व धरणे आंदोलन विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह सुधाकर अडबाले यांच्या आदेशानुसार ७ जानेवारीला दुपारी ३ वाजता विदर्भातील सर्व जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयसमोर होत आहे.
या धरणे आंदोलनामध्ये केंद्रीय कर्मचाऱ्याप्रमाणे ७ वा वेतन आयोग राज्यातील सर्व शिक्षण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना लागू करण्यात यावा, अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये निधीची तरतूद करण्यात यावी, सत्र २०१५-१६ मध्ये अतिरिक्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भाने शिक्षण आयुक्तांचा १९ नोव्हेंबर २०१६ चे जाचक नियमबाह्य परिपत्रक रद्द करण्यात यावे, कोणत्याही शिक्षकाचे वेतन थांबविण्यात येवू नये, अंशदायी पेन्शन योजना रद्द करून राज्यातील सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेंशन योजना लागू करावी तसेच १ नोव्हेंबर २००५ पूर्वी अंशत: अनुदानित तुकड्या/शाळेवरील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुनीच पेन्शन योजना सुरू ठेवून त्यांच्यावरील अन्याय तात्काळ दूर करण्यात यावा, मूल्यांकनामध्ये निकषपात्र ठरलेल्या राज्यातील विनाअनुदानित शाळा व तुकड्यांना विनाअट अनुदान मंजूर करणे व अनुदानाची जाचक अटी रद्द करून अर्वरित शाळांना तात्काळ अनुदान देणे आदी विविध मागण्या करण्यात येणार आहे.
चंद्रपूर येथील धरणे आंदोलनात विमाशी संघाचे सरकार्यवाह सुधाकर अडबोल सहभागी होत आहे. जिल्ह्यातील सर्व प्राचार्य, मुख्याध्यापक, कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक, शिक्षक, शिक्षिका-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन विमाशी संघाचे जिल्हाध्यक्ष केशवराव ठाकरे, जिल्हाकार्यवाह श्रीहरी शेंडे, कार्याध्यक्ष लक्ष्मणराव धोबे, उपाध्यक्ष दिगांबर कुरेकर यांनी केले आहे. (प्रतिनिधी)