आज प्रचारतोफा थंडावणार

By admin | Published: February 14, 2017 12:32 AM2017-02-14T00:32:48+5:302017-02-14T00:32:48+5:30

जिल्हा परिषदेच्या ५६ जागांसाठी ३१५ उमेदवार रिंगणात आहेत. तर पंचायत समितीच्या ११२ जागांवर ५१८ उमेदवार निवडणूक लढवित आहेत.

Today, we will stop the campaign | आज प्रचारतोफा थंडावणार

आज प्रचारतोफा थंडावणार

Next

८३३ उमेदवार रिंगणात : रात्रीपासून चालणार गावागावांत गुप्त बैठकी
चंद्रपूर : जिल्हा परिषदेच्या ५६ जागांसाठी ३१५ उमेदवार रिंगणात आहेत. तर पंचायत समितीच्या ११२ जागांवर ५१८ उमेदवार निवडणूक लढवित आहेत. या निवडणुकीसाठी १६ फेब्रुवारी रोजी मतदान असल्याने तत्पूर्वी मंगळवार रात्री १० वाजतापासून प्रचार बंद होणार आहे. त्यानंतर रात्रीपासून गुप्त बैठका आणि ‘इतर’ व्यवहार चालणार आहेत. या काळात आचारसंहितेचा भंग होऊ नये, याकरिता निवडणूक विभागाला डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावे लागणार आहे.
भाजप वगळता इतर पक्षांचे कोणतेही मोठे नेते जिल्ह्यात उमेदवारांच्या प्रचारासाठी आले नाहीत. भाजपच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी एक-एक सभा घेतली. उर्वरित संपूर्ण प्रचाराची धुरा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी सांभाळली. त्यांच्या सोबतीला जिल्ह्यातील भाजपचे आमदार होते. काँग्रेसच्या प्रचारासाठी विधानसभेतील उपगट नेते विजय वडेट्टीवार आणि माजी खा. नरेश पुगलिया यांनी प्रतिष्ठा पणाला लावली. तसेच काँग्रेसच्या माजी आमदारांनी प्रचारात उडी घेतली.
जिल्हा परिषदेसाठी ३९२ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज भरले होते. त्यापैकी ७७ जणांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यानंतर रिंगणात ३१५ उमेदवार शिल्लक राहिले. त्यामध्ये १६५ पुरूष आणि १५० महिला उमेदवार आहेत. १५ पंचायत समित्यांच्या ११२ जागांसाठी ६१६ इच्छुकांनी नामांकन दाखल केले होते. त्यापैकी ९८ उमेदवारांनी आपापली उमेदवारी मागे घेतली.
आता रिंगणात ५१८ उमेदवार असून त्यामध्ये २५४ महिला व २६४ पुरूष उमेदवार आहेत. या उमेदवारांना ११ लाख ५७ हजार ७१९ मतदान गुरूवारी मतदान करणार आहेत. त्याकरिता १ हजार ४४९ केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्ह्यातील १७८ मतदान केंद्र संवेदनशील समजले जातात. तर पाच तालुक्यांमध्ये ६३ केंद्र नक्षल प्रभावित आहेत. पंचायत समित्यानिहाय १६०० मतदान केंद्राध्यक्ष आणि ४८०० मतदान रविवारी प्रशिक्षण देण्यात आले. (प्रतिनिधी)

आता भर प्रत्यक्ष संपर्कावर
मंगळवारी प्रचार थंडावल्यावर उमेदवारांकडे प्रत्यक्ष संपर्काचा पर्याय शिल्लक राहतो. पुढील दीड दिवस ‘जमेल त्या पद्धतीने’ मतदारांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्याकरिता साम, दाम, दंड, भेदाला उधाण येणार आहे. जिल्ह्यात दारूबंदी असली तरी गेल्या दोन दिवसांत पोलिसांनी अवैध दारू पकडण्याच्या मोठ्या प्रमाणात कारवाया केल्या आहेत. १५ फेब्रुवारीच्या रात्रीपर्यंत आणखी अवैध दारू पकडली जाण्याची शक्यता आहे. न पकडली जाणारी अवैध दारू मतदारांपर्यंतही पोहोचविली जाण्याची शक्यता आहे.

बाजार पुढे ढकलले
ही निवडणूक १६ फेब्रुवारी रोजी होत असून सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान होेणार आहे. त्यामुळे निवडणुका असलेल्या क्षेत्रात गुरूवारचे आठवडी बाजार पुढे ढकलण्यात आले आहेत. ते अन्य दिवशी भरविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी दिली आहे

लहान पक्ष ठरणार डोकेदुखी
सत्ताधारी भाजप अणि विरोधी पक्ष काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात ही लढत होत असली तरी शिवसेना, शेतकरी संघटना या लहान पक्षांचे उमेदवार मोठ्या प्रमाणात मतदान घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे लढतीमधील दोन किंवा तीन उमेदवारांच्या विजयाचे अंतर कमी करण्यात किंवा पराभूत करण्यात हे लहान पक्षांचे उमेदवार निर्णायक ठरू शकतात. प्रचार थांबल्यावर लहान पक्षांची मते आपल्याकडे खेचण्याकरिता रस्सीखेच सुरू होणार आहे. अपक्ष उमेदवारही रिंगणात आहेत. तेदेखील लढतीतील उमेदवारांसाठी डोकेदुखी ठरू शकतात.

Web Title: Today, we will stop the campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.