कार्तिक पौर्णिमेनिमित्त आज वढा यात्रा
By Admin | Published: November 25, 2015 03:36 AM2015-11-25T03:36:04+5:302015-11-25T03:36:04+5:30
येथून नजीकच्या वढा येथील पैनगंगा व वर्धा नदी संगम तीर्थस्थळी बुधवारपासून यात्रेला प्रारंभ होणार आहे.
घुग्घुस : येथून नजीकच्या वढा येथील पैनगंगा व वर्धा नदी संगम तीर्थस्थळी बुधवारपासून यात्रेला प्रारंभ होणार आहे. यात्रेकरीता चंद्रपूर आगाराने दिवसभर विशेष यात्रा बसेसची व्यवस्था केली आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील या दृष्टीने घुग्घुस पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त ठेवला आहे.
विदर्भातील लहान पंढरपूर म्हणून सुपरिचित वढा येथील दोन्ही नद्या संगम व तीरावर प्राचीन विठ्ठल रुखमाईचे मंदिर आहे. या पंचक्रोशितील भाविक मोठ्या भावनेने पहाटेपासून स्रानासाठी येऊन विठ्ठल रुखमाईच्या दर्शनासाठी मोठी गर्दी करतात. मंदिर परिसरात अनेक देविदेवताच्या मूर्ती असून त्यात विशेष शिवपुत्र कार्तिकेयची मूर्ती आहे. दरवर्षी पायदळ वारी करणाऱ्या एका महिलेने सदर मंदिरातील विठ्ठल रुक्माईची मूर्ती बऱ्याच वर्षांआधी पंढरपूर वरुन आणली आणि तिच मूर्ती आजही मंदिरात उभी आहे.
नदीच्या दुसऱ्या काठावर आठव्या शतकातील शिवाचे जागृत मंदिर आहे. दहा वर्षांपूर्वी गुप्तधन शोधाणाऱ्या मंडळीची वर्दळ वाढली आणि त्याठिकाणी नरबळी सारख्या घटना घडण्याची शक्यता वाढल्याने याकडे घुग्घुस ठाण्याचे तत्कालिन ठाणेदार पुंडलिक सपकाळे यांनी पुढाकार घेऊन वर्तमान जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक चंद्रकात गोहोकर, गावातील प्रतिष्ठित नागरिक, लहानश्या जुगाद गावातील लोकांच्या आणि घुग्घुसच्या सर्वधर्मीयाच्या सहकार्याने भूगर्भात मातीने दबलेली मोठ्या आकाराची पिंड मोकळी केली.
मंदिराच्या साफसफाईचे काम करुन मंदिराच्या जीर्णोद्वाराचे काम सुरू केले. आज त्या मंदिराचा कायापालट झाला. दररोज सकाळी, सायंकाळी येथे नियमित आरती होते. वेकोलि चंद्रपूरच्या सहकार्याने पाणी व निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. (वार्ताहर)
वढा यात्रेसाठी
जादा बसेस
४चंद्रपूर तालुक्यातील श्री तिर्थक्षेत्र वढा येथे कार्तिक पोर्णिमेला मोठी यात्रा भरते. भाविकांना प्रवास दरम्यान गैरसोय होऊ नये म्हणून काळजी घेत आहे. यात्रेकरुंच्या सोयीसाठी राज्य परिवहन मंडळाने चंद्रपूर, घुग्घुस, पडोली, भद्रावती, गडचांदूर, भोयेगाव या भागातील भाविकांसाठी एस.टी. च्या जादा बसेस सोडण्याची व्यवस्था करण्यात आली. यासाठी २० ज्यादा बसेस सोडण्यात येणार आहे. असे महामंडळाचे चंद्रकांत वडस्कर यांनी दिली.