आजच्या युवा पिढीने शिवचरित्र वाचावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 11:51 PM2018-03-06T23:51:44+5:302018-03-06T23:51:44+5:30
केवळ शिवजयंती उत्सव साजरे करणे हा आपला उद्देश नाही. तर शिवाजी महाराजांचे विचार प्रत्येकांच्या घराघरात रुजविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी आजच्या युवकांने शिवचिरत्र वाचावे, असे आवाहन महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी केले.
आॅनलाईन लोकमत
ब्रह्मपुरी : केवळ शिवजयंती उत्सव साजरे करणे हा आपला उद्देश नाही. तर शिवाजी महाराजांचे विचार प्रत्येकांच्या घराघरात रुजविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी आजच्या युवकांने शिवचिरत्र वाचावे, असे आवाहन महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी केले.
शिवजयंती उत्सव समिती ब्रह्मपुरीद्वारा शेष मंदिराच्या प्रांगणात आयोजित व्याख्यानाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
बाबासाहेब पुढे म्हणाले, शिवजयंती उत्सवात आपण सजून धजून सहभागी होत असतो. परंतुु, शिवाजी महाराजांचे कर्तुत्व असामान्य आहे. शिवाजी महाराज अनेक गुणांनी परिपूर्ण आहेत. पन्हाळगडची लढाई शिवरायाने केवळ उत्कृष्ट नियोजनाच्या आधारे जिंकली. शिवाजी महाराजांची योजना आखण्याची पद्धत वेगळीच होती. त्यामुळेच लाखो सैन्यांपुढे, अत्यल्प मावळे विजय संपादन करीत होते. शिवाजी महाराजांचा आपल्या सैन्यावर मोठ्या प्रमाणात विश्वास होता. ते ज्यांच्यावर काम सोपवित असत. ते काम त्याचे मावळे किंवा सैन्य निष्ठापूर्वक करत होते. मात्र आजच्या परिस्थितीत तुम्ही आम्ही कुणावरही निष्ठा ठेवत नाही. त्याचबरोबर वेळेचे बंधनही पाळत नाही. त्यामुळे आपल्याला खरे शिवाजी महाराज चिंतन, मनन करुन समजून घेणे हाच खरा जयंती उत्सवाचा भाग असला पाहीजे.
दरम्यान, त्यांनी शाहिस्तेखान, अफझलखान यांच्यासोबत झालेल्या युद्धाबद्दलही मार्गदर्शन केले. महाराज एक चारित्र्यवान योद्धा होते. महाराज आपल्याला अनेक बाबी सांगून गेले आहेत. त्या बाबी आपण आत्मसात कराव्यात, असा उपदेश तब्बल एक तासाच्या व्याख्यानात त्यांनी दिला आहे.
व्याख्यानापूर्वी शहरातून भवानी माता देवस्थानामधून पालखीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शिवाजी महाराजांवर आधारीत स्पर्धा परीक्षेतील प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार व स्वच्छ अभियान अंतर्गत नगर परिषद कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. संचालन व आभार अभिजित परकावार यांनी केले. कार्यक्रमाला शहरातील डॉक्टर, वकील, प्राध्यापक तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होता.
संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी पोलिसांच्या देखरेखीत
संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी पुरंदरे यांच्या व्याख्यानाला विरोध केला होता. परंतु, व्याख्यानापूर्वीच ‘त्या’ पदाधिकाºयांना पोलिसांनी आपल्या नजरकैदमध्ये बंदिस्त करून ठेवले असल्याने व्याख्यान शांत पद्धतीने पार पडले. दरम्यान व्याख्यानाप्रसंगी कोणतीही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत परदेशी, पोलीस निरीक्षक विलास चव्हाण यांच्यासह राखीव पोलीस दलाचे जवान कार्यक्रमस्थळी व शहरातील मुख्य चौकात कडक पहारा देत होते. त्यामुळे ब्रह्मपुरीला व्यख्यानादरम्यान बराच वेळ छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.