घरात शौचालय, तरीही नागरिक उघड्यावर !
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 02:23 PM2024-05-21T14:23:36+5:302024-05-21T14:24:30+5:30
Chandrapur : गावखेड्यात हागणदारीमुक्तीचा फज्जा
लोकमत न्यूज नेटवर्क
वासेरा : शासनाने ग्रामीण भागात 'स्वच्छ भारत मिशन' राबवून जनतेच्या सुदृढ आरोग्यासाठी गावे हागणदारीमुक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी प्रत्येक कुटुंबाला घरोघरी शौचालय संकल्पना राबवून शौचालय बांधून दिले. मात्र, आजही घरात शौचालय असताना सिंदेवाही तालुक्यातील गावखेड्यांत महिला, पुरुष हे उघड्यावर शौचास जाताना दिसतात. तर शौचालयात काड्या, गोवरी इत्यादी साहित्य ठेवलेले आढळते. परिणामी ग्रामीण भागात हागणदारीमुक्तीचा फज्जा उडाल्याचे दिसून येत आहे.
गतकाळात शासनाने हागणदारीमुक्तीचा नारा देत सर्वत्र जनजागृती केली. जनतेचे आरोग्य सुदृढ राहावे, या दृष्टीने ही संकल्पना महत्त्वाची असल्याचे पटवून देण्यात आले. शासनाने कोणीही उघड्यावर शौचास जाऊ नये, यासाठी प्रत्येक कुटुंबाला शौचालयासाठी अनुदान उपलब्ध करून दिले. तसेच ग्रामीण भागात पंचायत समिती व ग्रामपंचायतींतर्गत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली. गुड मॉर्निंग पथके नेमण्यात आली. या पथकांद्वारे रोज फेरफटका मारून जनतेमध्ये जनजागृती करत आवश्यक सूचना केल्या. त्यासाठी हागणदारीमुक्त गावांना पुरस्कृतही करण्यात आले. पण हे अभियान काही दिवसांपुरतेच मर्यादित राहिल्याचे दिसून येते.
गुड मार्निंग पथके गेली कुठे?
■ सद्यस्थितीत कोणत्याही गावात हागणदारीमुक्तीची संकल्पना प्रत्यक्षात कुणीही अमलात आणताना दिसत नाही. तसेच कुठेही गुड मॉर्निंग पथक कार्यरत असल्याचे जाणवत नाही. त्यामुळेच की काय सिंदेवाही तालुक्यातील ग्रामीण भागात उघड्यावर शौचास जाणाऱ्यांची संख्या दिव- सागणिक वाढत आहे.
■ एकूणच प्रशासनाच्या दुर्लक्षित भूमिकेमुळे स्वच्छता अभियानाचे व हाग- णदारीमुक्तीचे तीनतेरा वाजले आहेत. तेव्हा ग्रामीण भागात खरंच हागण- दारीमुक्ती करायची असेल, तर प्रशासनाला जोमाने आणि निरंतर काम करावे लागेल. जेणेकरून गावखेड्यात आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार नाही, असे नागरिकांचे मत आहे.