प्लॅटफाॅर्मवरील शौचालय गाडी आली तरी बंदच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:54 AM2021-03-04T04:54:06+5:302021-03-04T04:54:06+5:30
बल्लारपूर : बल्लारशाह रेल्वे स्थानकावर आजघडीला रेल्वे प्रवाशांच्या सुविधांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप रेल्वे प्रवासी करीत आहेत. बुधवारी ...
बल्लारपूर : बल्लारशाह रेल्वे स्थानकावर आजघडीला रेल्वे प्रवाशांच्या सुविधांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप रेल्वे प्रवासी करीत आहेत. बुधवारी सकाळी ९.१० वाजता दक्षिणेकडे जाणारी गोरखपूर एक्स्प्रेस आली व सुटली तरी प्लॅटफाॅर्मवरील शौचालय बंदच होते. यामुळे हे शौचालय कोणासाठी, असा प्रश्न रेल्वे प्रवाशांनी उपस्थित केला आहे.
बल्लारशाह स्थानकावरील फलाट क्रमांक एकवर जनरल प्रवाशांच्या ( पुरुष व महिला ) सोयीसाठी शौचालय बांधण्यात आले आहे, परंतु ते नियमित उघडण्यात येत नसल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. बुधवारी सकाळी गोरखपूर एक्स्प्रेस गाडी आली. प्रवासी उतरले. शौचालयाकडे गेले तर ते कुलूपबंद होते. गाडी एक तास फलाटावर थांबली व समोर निघून गेली. तरीही शौचालय बंदच होते. यावरून स्थानकावरील रेल्वे व्यवस्थापक प्रवाशांच्या गैरसोयीकडे किती काळजीने बघतात, हे दिसून येते.