वरोऱ्यात बहरले इस्रायलचे टोमॅटो; तब्बल १४ फूट उंचीचे झाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2023 08:00 AM2023-04-06T08:00:00+5:302023-04-06T08:00:06+5:30
Chandrapur News वरोरा तालुक्यातील शेतकऱ्याने इस्त्रायलच्या टोमॅटोची लागवड केली आहे. दोनदा अपयश आल्यानंतर तिसऱ्यांदा हा प्रयोग यशस्वी झाला असून, टोमॅटोच्या झाडाची उंची तब्बल १४ फूट झाली आहे.
प्रवीण खिरटकर
चंद्रपूरः वरोरा तालुक्यातील शेतकऱ्याने इस्त्रायलच्या टोमॅटोची लागवड केली आहे. दोनदा अपयश आल्यानंतर तिसऱ्यांदा हा प्रयोग यशस्वी झाला असून, टोमॅटोच्या झाडाची उंची तब्बल १४ फूट झाली आहे. इस्त्रायलचे तापमान कमी आहे. त्याउलट चंद्रपूर जिल्ह्याचे तापमान अधिक असतानाही या झाडाला चांगले टोमॅटो लागले आहेत. विशेष म्हणजे ते टोमॅटो १२ महिने मिळणार आहेत.
कृषी विभागाच्या वतीने २०१९ मध्ये शेतकऱ्यांचा इस्त्रायल अभ्यास दौरा आयोजित केला होता. या दौऱ्यात २००८ मध्ये महाराष्ट्र शासनाने कृषिभूषण पुरस्काराने सन्मानित केलेले वरोरा तालुक्यातील चारगाव (बुज) येथील शेतकरी मधुकर भलमे हे सहभागी झाले होते. इस्त्रायलच्या अनेक शेतात भेटी देऊन पिकांची पाहणी केली असता, मधुकर भलमे यांच्या दृष्टीस टोमॅटोचे झाड पडले. त्यांनी टोमॅटोची चव घेतली. त्यानंतर त्याचे बियाणे ते सोबत घेऊन आले. सन २०२० च्या मार्च महिन्यात त्यांनी आपल्या शेतात टोमॅटोच्या बिया लावल्या. झाड तयार झाले; परंतु उष्ण वातावरणामुळे ते वाळून गेले. दोनदा अपयश आल्यानंतरही त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत. नेहमी ओलावा राहात असलेल्या जमिनीत टोमॅटोचे बियाणे लावले. अल्पावधीतच त्या झाडाची उंची १४ फूट झाली. एका टोमॅटोचे वजन साधारण १०० ग्रॅम असून दररोज १० ते १२ टोमॅटो एका झाडातून निघत आहेत. टोमॅटोची चव भारतातल्या टोमॅटोसारखीच असल्याची माहिती मधुकर भलमे यांनी दिली.
जिल्हा कृषी अधीक्षकांनी दिली भेट
हे टोमॅटो बघण्यासाठी जिल्हा कृषी अधीक्षक भाऊसाहेब बराटे यांनी भेट दिली. येत्या काही महिन्यांत वरोरा परिसरात इस्त्रायलच्या टोमॅटोचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होईल, असे मानले जात आहे. काही वर्षांपूर्वी मधुकर भलमे यांनी सांबार लावला होता. त्याची उंची १२ फूट झाली होती. याची दखल राष्ट्रपती भवन कार्यालयाने घेतली होती, हे विशेष.