वरोऱ्याचा ओंकार कुनवटकर जिल्ह्यात टॉपर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 12:38 AM2019-05-29T00:38:58+5:302019-05-29T00:39:24+5:30
फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज मंगळवारी आॅनलाईन जाहीर करण्यात आला. यात चंद्रपूर जिल्ह्याचा निकाल ८०.८९ टक्के लागला. विदर्भातील निकालात चंद्रपूर जिल्हा पाचव्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यातून वरोरा हिरालाल लोया कनिष्ठ महाविद्यालयातील ओंकार मधुकर कुनवटकर हा विज्ञान शाखेचा विद्यार्थी ९४.९२ टक्के घेऊन जिल्ह्यात प्रथम आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज मंगळवारी आॅनलाईन जाहीर करण्यात आला. यात चंद्रपूर जिल्ह्याचा निकाल ८०.८९ टक्के लागला. विदर्भातील निकालात चंद्रपूर जिल्हा पाचव्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यातून वरोरा हिरालाल लोया कनिष्ठ महाविद्यालयातील ओंकार मधुकर कुनवटकर हा विज्ञान शाखेचा विद्यार्थी ९४.९२ टक्के घेऊन जिल्ह्यात प्रथम आला आहे. त्यापाठोपाठ चंद्रपूर येथील जनता महाविद्यालयातील विज्ञान शाखेचा विद्यार्थी प्रणित गिरडकर हा ९३.०७ टक्के घेऊन द्वितीय आला आहे. तर ब्रह्मपुरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील विज्ञान शाखेची विद्यार्थिनी तनया राजेश गेडाम ही ९२.६१ टक्के गुण घेऊन जिल्ह्यात तृतीय आली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातून एकूण २८ हजार ६३४ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यातील २८ हजार ६१८ विद्यार्थी परीक्षेला बसले. यामधील २३ हजार १४९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एकूण ६८८ विद्यार्थ्यांनी प्राविण्य प्राप्त केले आहे.
पाच हजार ८०९ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. १४ हजार ९९४ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत तर एक हजार ६५८ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. विदर्भात चंद्रपूर जिल्ह्याचा निकाल पाचव्या क्रमांकावर आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदाची टक्केवारी घसरली आहे.
मुलींनीच मारली बाजी
मागील अनेक वर्षांची परंपरा कायम राखत यंदाही बारावीत मुलींनीच बाजी मारून मुलांच्या तुलनेत त्या अव्वल राहिल्या. यंदाच्या बारावीच्या परीक्षेत एकूण १४ हजार ८५० मुलांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यातील १४ हजार ८३८ मुले परीक्षेला बसली. यातील ११ हजार ५१२ मुले उत्तीर्ण झालीे. उत्तीर्ण मुलांची टक्केवारी ७७.५८ आहे. यासोबतच एकूण १३ हजार ७८४ मुलींनी परीक्षेसाठी नोंदणी केली. यातील १३ हजार ७८० मुलींनी परीक्षा दिली. यातून ११ हजार ६३७ मुली उत्तीर्ण झाल्या. उत्तीर्ण मुलींची टक्केवारी ८४.४५ आहे.
ग्रामीण विद्यार्थ्यांनी दाखविली चुणूक
जिल्ह्यातील सर्व तालुक्याचा निकाल बघता ग्रामीण विद्यार्थ्यांनी निकालात आपली चुणूक दाखवून शहरी विद्यार्थ्यांवर मात केल्याचे दिसून येते. चंद्रपूर जिल्ह्यातून गोंडपिपरी, कोरपना, मूल, नागभीड, सावली, सिंदेवाही व जिवती या तालुक्यातील ग्रामीण विद्यार्थ्यांनी चांगला निकाल दिला आहे. त्या तुलनेत बल्लारपूर, ब्रह्मपुरी, राजुरा, वरोरा या शहरी भागातील मुले निकालात मागे पडली आहे.
वाणिज्य शाखेचा निकाल सर्वाधिक
आजपर्यंत विज्ञान शाखा निकालात बाजी मारत आली आहे. मात्र यावर्षी प्रथमच बारावी परीक्षेत वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. वाणिज्य शाखेतून एकूण दोन हजार १५५ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली. यातील दोन हजार १५४ विद्यार्थी परीक्षेला बसले. यातून एक हजार ८९४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. १५९ विद्यार्थ्यांनी प्राविण्य प्राप्त केले असून ६०५ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. वाणिज्य शाखेची टक्केवारी ८७.९३ आहे. कला शाखेतून एकूण १३ हजार ८७५ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली. यातील १३ हजार ८६९ विद्यार्थी परीक्षेला बसले. पैकी १० हजार ५९४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कला शाखेची टक्केवारी ७६.३९ आहे. विज्ञान शाखेतून एकूण १० हजार ९६६ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली. यातील १० हजार ९५९ विद्यार्थी परीक्षेला बसले. यापैकी नऊ हजार ४०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. विज्ञान शाखेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी ८५.८२ आहे. तर एमसीव्हीसी (व्होकेशनल) प्रकारातून एक हजार ६३८ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली. यातील एक हजार ६३६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी एक हजार २५६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या शाखेची टक्केवारी ७६.७७ इतकी आहे.
पोंभूर्णा तालुका पिछाडीवर
यंदाच्या बारावी परीक्षेच्या निकालात जिवती तालुका (९०.६२) जिल्ह्यात अव्वल राहिला. सावली तालुका (८७.९४ टक्के ) दुसºया तर पोंभूर्णा तालुका ६१.३४ टक्के घेऊन पिछाडीवर गेला आहे.