मुसळधार पावसाने झोडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2020 05:00 AM2020-03-10T05:00:00+5:302020-03-10T05:00:57+5:30
रविवारी जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पाऊस पडला होता. त्यानंतर सोमवारी सकाळपासून ऊन्ह तापू लागले. दरम्यान, दुपारी २ वाजतापासून अचानक वातावरणात बदल होऊ लागला. ढगाळ वातावरण तयार झाले आणि दुपारी ३ वाजतापासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. आज होळी असल्यामुळे र
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यात सर्वत्र होळी उत्साहात साजरी होत असतानाच दुपारी ३ वाजताच्या सुमारास चंद्रपूरसह जिल्ह्यातील जवळजवळ सर्वच भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली. कुठे तासभर तर कुठे अर्धा तास पाऊस बरसत राहिला. अचानक पाऊस आल्यामुळे अनेकांची तारांबळ उडाली. जिल्हाभरातील शेतपिकांचेही मोठे नुकसान झाले.
रविवारी जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पाऊस पडला होता. त्यानंतर सोमवारी सकाळपासून ऊन्ह तापू लागले. दरम्यान, दुपारी २ वाजतापासून अचानक वातावरणात बदल होऊ लागला. ढगाळ वातावरण तयार झाले आणि दुपारी ३ वाजतापासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. आज होळी असल्यामुळे रस्त्यावर रंगांची दुकाने सजली होती. मात्र अचानक पाऊस आल्यामुळे छोट्यामोठ्या व्यावसायिकांची तारांबळ उडाली. चंद्रपूरसह भद्रावती, वरोरा, चिमूर, सिंदेवाही, मूल, नागभीड, बल्लारपूर, राजुरा, गोंडपिपरी, कोरपना आदी तालुक्यातही मुसळधार पावसाने हजेरी लावली. सध्या शेतात रबी हंगामाचे पीक आहे. याशिवाय काही शेतकऱ्यांनी धानाचे दुबार पीकही लावले आहेत. खरीप हंगामातील कापूसही अनेकांच्या शेतात आहे. सोमवारी अचानक आलेल्या पावसामुळे या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने नुकसानग्रस्त पिकांचे सर्वेक्षण करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. भद्रावती तालुक्यात झालेल्या वादळी पावसाने रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले. विंजासन परिसरात जगन दानव, सुनील पायघन यांच्या शेतातील ज्वारी, गहू या पिकांचे नुकसान झाले. संपूर्ण पीक आडवे झाले आहे. घोडपेठ व परिसरातील तिरवंजा, कवठी, कचराळा, गुंजाळा, चालबर्डी, चपराळा, निंबाळा या गावांना पावसाने अक्षरश: झोडपून काढले. सध्या शेतातील हरभरा पीक काढणीला आलेले आहे. मात्र या अकाली पावसाने शेतकºयांचा हातचा घास हिरावला आहे. शासनाने सर्वेक्षण करावे, अशी मागणी आहे.
विटा व्यावसायिकांना फटका
पोंभुर्णा : तालुक्यातील सर्वच भागात सोमवारी सायंकाळी ५ वाजता मेघगर्जना होवून जोरदार पावसाला सुरूवात झाली. पावसामुळे काही काळ जनजीवन विस्कळीत झाले. या पावसाचा सर्वाधिक फटका विटा व्यवसायिकांना बसला. शेतकºयांच्या शेतात असलेले मुंग, हरभरा व अन्य पीक यावर ताडपत्री न टाकल्याने प्रचंड नुकसान झाले. या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात विटा व्यवसाय चालतो. पावसामुळे विटाभट्टीत पाणी शिरले. यात त्यांचे मोठे नुकसान झाले.
होळीच्या आनंदावर विरजण
सोमवारी सर्वत्र होळीचा उत्साह होता. चंद्रपूरसह गावागावात या दिवशी सायंकाळी होलिका दहन केले जाते. यासाठी नागरिकांनी आपापल्या वार्डात सकाळपासून लाकडे गोळा करून आणली व होळी पेटविण्यासाठी रचून ठेवली होती. मात्र काही ठिकाणी दुपारी व काही ठिकाणी सायंकाळच्या सुमारास अचानक मुसळधार पाऊस आल्याने संपूर्ण लाकडे ओली झाली. अनेकांच्या होळी पेटविण्याच्या जागेवरही चिखलाचे साम्राज्य तयार झाले. पावसामुळे होळीच्या आनंदावर विरजण पडले.