ताडोबा व्याघ्र प्रकल्पात १ जुलैपासून पर्यटन सफारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 11:54 AM2020-06-25T11:54:56+5:302020-06-25T11:55:27+5:30
आता १ जुलै २०२० पासून ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील पर्यटनासाठी केवळ बफर क्षेत्र सुरू करण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर मार्च २०२० पासून ताडोबा व्याघ्र प्रकल्पात पर्यटन बंद करण्यात आला होता. राज्याचे मुख्य वन्यजीव रक्षक तथा प्रधान मुख्य वनसंरक्षकांच्या आदेशानुसार आता १ जुलै २०२० पासून व्याघ्र प्रकल्पाच्या केवळ बफर क्षेत्रात पर्यटन सुरू करण्यात येणार आहे. कोरोनामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून काही नियम ठरविण्यात असून पर्यटकांनी काटेकोरपणे अंमलबजावणी, असे आवाहन ताडोबाचे क्षेत्र संचालक एन. आर. प्रवीण यांनी केले.
ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील पर्यटनासाठी आरक्षण हे ऑफलाईन राहणार आहे. त्यासाठी संबंधित प्रवेशद्वारावर जो प्रथम येणार त्यालाच आरक्षण मिळेल. पर्यटनाची वेळ सकाळी ६.३० ते सकाळी १० आणि दुपारी २ ते सायंकाळी ५.३० वाजतापर्यंत अशी राहणार आहे. त्यासाठी प्रत्येक फेरीचे जिप्सी शुल्क मार्गदर्शन शुल्क, कॅमेराचे शुल्क निश्चित करण्यात आले. प्रत्येक बफर प्रवेशद्वारातून एका फेरीत केवळ ६ जिप्सी वाहनांनाच प्रवेश देण्यात येईल. प्रवेश देण्यात येणाऱ्या ६ वाहन व पर्यटक मार्गदर्शकांपैकी ४ वाहने व मार्गदर्शन संबंधित बफर प्रवेशद्वारावर नोंदणी झाली असेल तर उर्वरित २ वाहने व मार्गदर्शक नजिकच्या कोअर प्रवेश द्वारावरील नोंदणीकृत असतील. पर्यटन वाहनात बसण्यापूर्वी पर्यटकांनी सॅनिटायझरने हात निर्जंतुक करावे. याशिवाय कोणत्याही पर्यटकाला जिप्सीमध्ये बसू दिले जाणार नाही. सॅनिटायझर आणण्याची जबाबदारी पर्यटकांची आहे. मास्क लावणाऱ्या पर्यटकांनाच व्याघ्र प्रकल्पात प्रवेश देण्यात येईल, अशी माहिती क्षेत्र संचालक एन. आर. प्रवीण यांनी ‘लोकमत’ दिली.
सहा प्रवेशद्वारातून मिळणार प्रवेश
ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात पर्यटन करण्यासाठी मोहुर्ली- देवाडा-अडेगाव-आगझरी, खुटवंडा- जुनोना, नवेगाव-रामदेगी-अलीझंजा-निमडेला, कोलारा-मदनापूर, सिरखेडा, पांगडी आणि झरी-पेठ केसलाघाट आदी सहा प्रवेशद्वारातून पर्यटकांना प्रवेश देण्यात येणार आहे.