रामदेगी-संघारामगिरीचा परिसर पर्यटकांनी फुलला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 06:00 AM2019-08-23T06:00:00+5:302019-08-23T06:00:45+5:30
रामदेगी परिसर सन १९५५ ला निर्माण झाला असून ताडोबा अभयारण्याचा एक भाग आहे. येथे पुरातन काळातील देवस्थान आहे. हे मंदिर काळ्या दगडांनी निर्माण केलेले आहे. या मंदिरात शिवलिंग व चार फूट उंचीची पितळी मूर्ती आहे.
आशिष गजभिये ।
लोकमत न्यूज नेटवर्क
खडसंगी : रामायणात श्रीराम आणि सीता यांना चौदा वर्षांचा वनवास झाला होता. या काळात श्रीराम व सीता यांनी रामदेगी - संघारामगिरी जंगलात वास्तव्यास होते, असे बोलल्या जाते. श्रीरामाच्या वास्तव्याने पावन झालेल्या रामदेगी परिसरात निसर्गरम्य परिसर, चंदइ नाला प्रकल्प, संघारामगिरीची टेकडी, धबधबा, पाण्याची सात कुंड आहे. येथे पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असून सध्या हा परिसर पर्यटकांनी फुलला आहे.
पावसाळ्याच्या दिवसात या ठिकाणी नैसर्गिक सौंदर्य, राम-सीतेचे वास्तव्य असलेला हा परिसरात रथाच्या चाकांचे निशाण व चंदई नाला प्रकल्प बघण्याचा आनंद काही वेगळाच आहे.
चिमूर-वरोरा राष्टीय महामार्गावरील गुजगवान गावावरून पूर्वेस ५ किमी अंतरावर असलेल्या रामदेगीला जाण्यासाठी पक्का रस्ता आहे. या ठिकाणी मार्गशिष महिन्यातील पाच सोमवारी यात्रा भरते. यावेळी हजारो भाविक व पर्यटक या ठिकाणी भेट देतात.
रामदेगी परिसर सन १९५५ ला निर्माण झाला असून ताडोबा अभयारण्याचा एक भाग आहे. येथे पुरातन काळातील देवस्थान आहे. हे मंदिर काळ्या दगडांनी निर्माण केलेले आहे. या मंदिरात शिवलिंग व चार फूट उंचीची पितळी मूर्ती आहे. यासोबतच परिसरात राम, लक्ष्मण, सीता बजरंगबली व विठ्ठल-रुक्मिनीचे मंदिर आहेत. मंदिराची स्थापना १९५८ ला झाली. टेकडीवरून बघितल्यानंतर हिरवाईने नटलेला जंगलाचा परिसर, मंदिर, तलावाच चित्र बघून वेगळाच आनंद निर्माण होतो.
जमनागडपासून उत्तरेला श्रीरामांच्या वास्तव्याची जागा आहे. या ठिकाणाला भीमनचापरा म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी श्रीराम आराम करायचे. असे सांगितल्या जाते. मंदिरापासून भीमचापरा हा प्रवास पर्यटकांना अचंबित करणारा आहे. वन विभागामार्फत वन्य प्राण्याचा वावर असल्याचे कारण देऊन काही दिवसांपासून येथे प्रवेश नाकारला जात आहे. याच परिसरात टेकडीवर वाघांच्या गुफा बघावयास मिळतात. एका उंच ठिकाणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा पुतळा आहे. शिवमंदिर जवळच गायमुख आहे. मंदिराच्या मागच्या बाजुला उंचावरून वाहत असलेले पाणी कुंडात पडतात. या धबधब्यावर सध्या तरुणाई गर्दी करीत आनंद लुटत आहे. याच रामदेगीला बौद्ध बांधव संघारामगिरी नावाने संबोधित करतात. पूर्वी सम्राट अशोकाच्या राज्यकाळात भारत बौद्धमय होता. भिमानचापरा परिसरात बौद्धकालीन आसन आहे. याचा संबंध भगवान बुद्धांशी निगडित असल्याने या ठिकाणी बौद्ध भिक्खू नेहमी वास्तव्यास असतात. टेकडीवर बौद्ध विहारे आहेत. आषाढी पौर्णिमेपासून तर अश्विन पौर्णिमेपर्यंत बौध्द भिक्खुंचा वर्षावास या ठिकाणी चालतो. विदेशातील बौद्ध भिक्खूसुद्धा येथे मोठ्या प्रमाणात येतात.
ताडोबा व्याघ्र प्रकल्पजवळच हे स्थळ असल्याने आणि हिरवळीने नटलेल्या टेकड्या बघून मन आनंदित होते. हे क्षेत्र खडसंगी (बफर) वनपरिक्षेत्रांतर्गत असल्याने प्लास्टिक मुक्त आहे. सुरक्षेच्या दृष्टीने वन विभागाचे कर्मचारी या ठिकाणी असतात. अलीकडे विदर्भातील पर्यटकांसह मोठ्या प्रमाणात येथे शैक्षणिक सहलीसुद्धा येतात. सुट्यांच्या काळात या ठिकाणी पर्यटकांची वर्दळ असते. या ठिकाणी वाघ, बिबट, अस्वल , हरीण आदी वन्यप्राण्यांच वास्तव आहे.