घोडाझरीच्या ओव्हरफ्लोवर पर्यटकांची धूम; वीकेंडला वाढणार आणखी गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2022 10:54 AM2022-07-22T10:54:34+5:302022-07-22T10:59:02+5:30
तीन वर्षांनंतर घोडाझरी झाला ओव्हरफ्लो
घनश्याम नवघडे
नागभीड (चंद्रपूर) : घोडाझरी तलाव तीन वर्षांनंतर ओव्हरफ्लो झाल्यामुळे पर्यटकांची याठिकाणी गर्दी वाढली आहे. बुधवारी शेकडो पर्यटकांनी हजेरी लावून ओव्हरफ्लोचा आनंद लुटला.
२०१९ मध्ये हा तलाव ओव्हरफ्लो झाला होता. मागील वर्षीही हा तलाव ओव्हरफ्लोच्या टप्प्यात आला होता. पण पुरेशा पावसाअभावी ओव्हरफ्लो झाला नाही. परिणामी, पर्यटकांचा हिरमोड झाला. यावर्षी प्रथमच दमदार पाऊस पडल्याने १९ जुलैला तीन वर्षांनंतर ओव्हरफ्लो झाला आणि या ओव्हरफ्लोचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांनी गर्दी करणे सुरू केले आहे. बुधवारी तर या ओव्हरफ्लोवर पर्यटकांची प्रचंड गर्दी होती. शनिवारी आणि रविवारी यापेक्षा गर्दी राहील, असा अंदाज आहे. पर्यटकांचा हा ओघ लक्षात घेता पोलिसांनी बंदोबस्त लावण्याची गरज व्यक्त होत आहे.
इंग्रजांनी केली निर्मिती
तिन्ही बाजूला असलेल्या नैसर्गिक टेकड्यांना मध्ये बांध घालून इंग्रजांनी १९०५ मध्ये या तलावाची निर्मिती केली. निसर्गाने या तलावावर नैसर्गिक सौंदर्याची मुक्तहस्ते उधळण केली आहे. निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक वर्षभर येथे गर्दी करीत असतात. पण ओव्हरफ्लोच्या फेसाळलेल्या पाण्यात मनसोक्त डुंबण्याची मजा पावसाळ्यातच असते. चंद्रपूर जिल्ह्यातीलच नव्हे तर पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यातील पर्यटकही येथे येतात.