ताडोबातील वाघांचे तीन बछडे वेधताहेत पर्यटकांचे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2022 07:00 AM2022-03-10T07:00:00+5:302022-03-10T07:00:02+5:30
पाच महिन्यांपूर्वी ताडोबा येथील झरणी या वाघिणीने तीन बछड्यांना जन्म दिला होता. या बछड्यांसह झरणी आता या प्रवेशद्वारावर पर्यटकांना दर्शन देत आहे.
राजकुमार चुनारकर
चंद्रपूर : ताडोबाच्या चार प्रवेशद्वारांपैकी चिमूर तालुक्यातील रामदेगी प्रवेशद्वारातून पर्यटन सफारीसाठी पर्यटक पसंती देत आहेत. पाच महिन्यांपूर्वी येथील झरणी या वाघिणीने तीन बछड्यांना जन्म दिला होता. या बछड्यांसह झरणी आता या प्रवेशद्वारावर पर्यटकांना दर्शन देत आहे.
वाघांच्या हमखास दर्शनासाठी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प प्रसिद्ध आहे. ताडोबातील कोअरच्या चार प्रवेशद्वारांपैकी व्यवस्थापन मोहर्ली व कोलारा गेटकडे अधिक सुविधा आहेत. अन्य प्रवेशद्वार उपेक्षित असतात. यामुळेच पर्यटकसुद्धा मोहर्ली व कोलारा गेटवरून ताडोबात जाण्यास पसंती देतात. रामदेगी, खुटवंडा गेटकडे पर्यटक आकर्षित होत नाहीत, अशी खंत रामदेगी, खुटवंडा गेटवरील गाईड, जिप्सी चालक व्यक्त करतात.
रामदेगी गेटवर व्यवस्थापन लक्ष देत नसले, तरी वाघांचा वावर मात्र या परिसरात अधिक आहे. याच गेट परिसरात माया वाघिणीने दोनदा बछड्यांना जन्म दिला. ते याच परिसरात वास्तव्यात होते. मायानंतर मयूरी वाघिणीने काही काळ आपल्या विविध छबी दाखविल्या. आता झरणी वाघिणीचे तीन बछडे मोठे होत आहेत. हा झरणीचा परिवार पर्यटकांना सुखावून जात आहे. रामदेगी गेटवरून पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना झरणी आपल्या अनेक मुद्रांचे दर्शन देत आकर्षित करीत आहे. त्यामुळे रामदेगी गेटचे बुकिंग हाऊसफुल्ल झाले असल्याचे गाईड, चालक सांगत आहेत.
झरणीसह बछडे पाणी पिताना कॅमेऱ्यात कैद
चिमूर तालुक्यातील खडसंगी बफर झोनअंतर्गत येणाऱ्या रामदेगी बफर झोनमध्ये पाच महिन्यांपूर्वी झरणीने तीन बछड्यांना जन्म दिला. चार महिने आपल्या दुधावर वाढवून तिने या तीन बछड्यांना बाहेर काढले. ते आता आईसोबत शिकारीचे धडे गिरवत आहेत. नुकतेच रामदेगी गेट परिसरातील मोहबोडी वॉटर होलजवळ पाणी पीत असताना पर्यटकांना त्यांचे दर्शन झाले. झरणीच्या परिवाराला नागपूर येथील फोटोग्राफर परसोडकर यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केले.