टोर्इंगची दबंगगिरी
By admin | Published: January 7, 2015 10:49 PM2015-01-07T22:49:02+5:302015-01-07T22:49:02+5:30
दररोज हजारो प्रवासी ये-जा करीत असलेल्या चंद्रपूर बसस्थानावरील सुरक्षेचा प्र्रश्न ऐरणीवर आला आहे. येथे पार्किंगची व्यवस्थाच नसल्याने अनेक प्रवाशांना, त्यांच्या कुटुंबीयांना आपले वाहन
वाहतूक व्यवस्थेचे धिंडवडे
साईनाथ कुचनकार - चंद्रपूर
दररोज हजारो प्रवासी ये-जा करीत असलेल्या चंद्रपूर बसस्थानावरील सुरक्षेचा प्र्रश्न ऐरणीवर आला आहे. येथे पार्किंगची व्यवस्थाच नसल्याने अनेक प्रवाशांना, त्यांच्या कुटुंबीयांना आपले वाहन रस्त्याच्या कडेला पार्क करावे लागते. रस्त्यावरील वाहनाच्या सुरक्षेचा प्रश्न उभा ठाकला आहे. अशावेळी वाहन धारक आपले वाहन बसस्थानकातील मोकळ्या जागेमध्ये ठेवतो. मात्र टोर्इंगवरील कर्मचारी येऊन वाहन उचलून नेतात. अनेकवेळा मानसिक त्रास होतो. याला जबाबदार बसस्थानक व्यवस्थापक की, वाहतूक पोलीस हा प्रश्न कायम आहे. बसस्थानकासह शहरातील इतर परिसरात किमान वाहनतळ उभे करून द्यावे, त्यानंतर चूक झाल्यास खुशाल वाहन उचलून न्यावे, अशा प्रतिक्रिया आता सामान्य नागरिक व्यक्त करीत आहे.
दिवसेंदिवस चंद्रपूर शहरात वाहनांच्या संख्येत वाढ होत आहे. मात्र त्या तुलनेत वाहनतळ नसल्याने हा प्रश्न गंभीर होत आहे. कोणतीही व्यवस्था नसताही वाहतूक विभागाकडून वाहनधारकांना अक्षरश: वेठीस धरण्याचा प्रयत्न केला जात आहे. येथील बसस्थानक परिसरात ठिकठिकाणी ‘नो पार्किंग’ असे फलक लावून बसस्थानक प्रशासन मोकळे झाले आहे. मात्र येणारे प्रवाशी आणि त्यांना आणून सोडणारे नागरिक आपले वाहन कुठे ठेवणार याचा कुठेही विचार केला नाही.
बसस्थानकाच्या अगदी समोर असलेल्या रस्त्यावर वाहन पार्क करावे, असे उत्तर दिले जाते. मात्र येथेही मोठ्या प्रमाणात अतिक्रमण असल्याने वाहनधारकांची चांगलीच पंचायत होत आहे. अशावेळी बहुतांश वाहनधारक बसस्थानाच्या आतील बाजूमध्ये असलेल्या मोकळ्या जागेवर वाहन पार्क करतात. मात्र वाहतूक विभागाचे कर्मचारी येथे येऊन वाहन घेऊन जातात. हा नित्यक्रम मागील वर्षभरापासून सुरु आहे. दररोज नवे वाहन धारक येतात. विशेष म्हणजे, वाहतूक विभागातील टोर्इंग वाहनावरील कर्मचारी बसस्थानक परिसरात असलेले वाहन उचलून कारवाई करतात. केवळ पाच ते सात मिनिटासाठी दोनशे ते तिनशे रुपयांचा आर्थिक भुर्दंड तथा मानसिक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे प्रथम वाहनतळ उपलब्ध करून द्या, नंतर कारवाई करा, असे प्रवाशी तसेच नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र याकडे बसस्थानक प्रशासन तथा वाहतूक पोलीस ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाही.
केवळ कारवाई करून आपली जबाबदारी पार पाडणारे वाहतूक पोलिसातील टोर्इंगमधील कर्मचारी प्रवाशांची अक्षरश: अरेरावी करतात. नियमाला बगल देत वाहतूक पोलिसात काम करत असल्याचा आव आणून प्रवाशी तथा वाहनधारकांना वाट्टेल ते बोलतात. मात्र या कर्मचाऱ्यांना गप्प ठेवण्याचे साधे औचित्य वाहतूक पोलीस दाखवित नाही. मागील वर्षभरापासून हा प्रकार सुरु आहे.टोर्इंग वाहन घेऊन यायचे आणि दुचाकी उचलून न्यायच्या या प्रकारामुळे वाहनधारक बेजार झाले आहे.