झाडावर चढून अस्वल चाखते मधाचा आस्वाद !
By Admin | Published: November 17, 2014 10:49 PM2014-11-17T22:49:48+5:302014-11-17T22:49:48+5:30
भटाळी कोळसा खाणीच्या उपक्षेत्रीय प्रबंधक कार्यालयातील प्रांगणात असलेल्या एका झाडावर चढुन एक अस्वल रोज मधमाशाच्या पोळ्यातील मध चाखत असल्याचा नित्यक्रम सुरू आहे.
दुर्गापूर : भटाळी कोळसा खाणीच्या उपक्षेत्रीय प्रबंधक कार्यालयातील प्रांगणात असलेल्या एका झाडावर चढुन एक अस्वल रोज मधमाशाच्या पोळ्यातील मध चाखत असल्याचा नित्यक्रम सुरू आहे. हा चित्तथरारक प्रकार न्याहळता येत नसला तरी झाडावर असलेल्या तीक्ष्ण नखाच्या पाऊलखुणा बघून थरकाप उडतो.
भटाळी कोळसा खाणीच्या उपक्षेत्रीय प्रबंधक कार्यालयाच्या प्रांगणात एक मोठे झाड आहे. या झाडाच्या उंच टोकावर मधमाशांचे पोळे आहेत. अनेक वर्षांपासून मधमाशांनी आपले या झाडावर आपले बस्तान मांडले आहे. या पोळ्यावर जंगलातून भटकत आलेल्या एका अस्वलाची नजर पडली. ही अस्वल गत तीन-चार महिन्यांपासून मध चाखण्याच्या प्रयत्नात आहे. मधमाशाचे पोळे झाडाच्या १५ ते २० फुट उंच बारीक फांद्यावर असल्याने ती त्यांच्यापर्यंत पोहचु शकत नव्हती. असाच रोज रात्री तिचा नित्यक्रम सुरू होता. सकाळी कार्यालयात आलेले कर्मचारी अस्वलाच्या झाडावर चढतानाच्या तीक्ष्ण नखाच्या उमटलेल्या पाउलखुणा बघून चकीत व्हायचे. असाच अस्वलाचा रोजचा नित्यक्रम सुरु आहे. आता ती चक्क बारीक फाद्यांवर जावून मधमाशाच्या पोळ्यातील मधाचा मनसोक्तपणे आस्वाद लुटत आहे. ती दररोज रात्री एक एक पोळे फस्त करीत असून एवढे असूनही मधमाशा वृक्ष सोडून इतरत्र हलायचा तयार नाही. त्यामुळे या अस्वलाचीही रोज रात्री येथे चांगली मेजवनी होत आहे.
वृक्षाच्या बुंध्यावर सभोवताल तिक्ष्ण नखाच्या खुणा उमटल्या आहेत. या झाडावर रोज नव्या नव्या खुणा येथे अनुभवास मिळत असून हे थरकाप उडविणारे दृष्य रात्री कोणालाही न्याहाळता येत नाही. मात्र या झाडावर उमटलेल्या खुणा बघायला वसाहतीतील नागरिका येतात. (वार्ताहर)