बुरूज ढासळण्यापूर्वीच सावरा रे...
By admin | Published: March 6, 2017 12:29 AM2017-03-06T00:29:47+5:302017-03-06T00:29:47+5:30
या शहराचे ऐतिहासिक वैभव म्हणून परकोट आणि चार प्रवेशद्वारांची गणना होते. या ऐतिहासिक वैभवाची ठिकठिकाणी पडसूड सुरू झाली आहे.
‘इको-प्रो’चे अभियान : ऐतिहासिक वारशाची जपणूक
चंद्रपूर : या शहराचे ऐतिहासिक वैभव म्हणून परकोट आणि चार प्रवेशद्वारांची गणना होते. या ऐतिहासिक वैभवाची ठिकठिकाणी पडसूड सुरू झाली आहे. परकोटावर झाडे आणि झुडूपे उगवली असल्याने त्यांच्या मुळांच्या आकारामुळे परकोटाला तडे गेले आहेत. तसेच बुरूजाला मोठ्या भेगा पडल्या आहेत. यासंदर्भात ईको-प्रो या संस्थेने पुरातत्व विभागाला सहभागी करून घेत १ मार्चपासून स्वच्छता मोहीम सुरू केली आहे.
चंद्रपूर शहरात ऐतिहासिक किल्ला, मंदिर, मूर्त्या, समाध्या मोठ्या प्रमाणात आहेत. त्याकडे लक्ष दिले न गेल्याने त्यावर झाडे-झुडपे वाढली आहेत. सभोवती जमा झालेला कचरा, पुरपाण्यामुळे ढासळणारे चिऱ्यामुळे ऐतिहासिक वास्तुचे अस्तित्व नष्ट होऊ लागले आहे. या वास्तु तुटलेल्या अनेक भागात अतिक्रमणसुद्धा वाढलेले आहेत. पुरातत्व विभागावर अवलंबून न राहता १ मार्चपासून किल्ला व परकोट स्वच्छता अभियान इको-प्रो संस्थेने सुरूवात केले असून पहिल्या टप्प्यात पठाणपुरागेट परिसरात स्वच्छता केली जात आहे. किल्लाच्या भिंतीवरील वाढलेली झाडे, वेलींमुळे किल्ल्यास तडे जात आहेत. या किल्लास भेगा, भगदाड पडलेले असून भिंती मोडकळीस येत आहे. या अभियानात इको-प्रो चे अध्यक्ष बंडू धोतरे, नितीन रामटेके, बिमल शहा, राजू काहीलकर, सुमित कोहळे, धमेंद्र लुनावत, रवींद्र गुरनुले, विकील शेंडे, महेश होकणे, हरिदास कोराम, विशाल रामेडवार, संजय सब्बनवार, सचिन धोतरे, अमोल उट्टलवार, रोशन धोतरे, सौरभ शेटये, शंकर पोईनकर, आशिष भोयर, सागर मस्के, वैभव मडावी, निखिल खांडगोरे, नरेंद्र नोकरकर आदी श्रमदान करीत आहेत. चंद्रपूरचा इतिहास जिवंत ठेवणे, ऐतिहासिक वास्तुंचे जतन करणे, इतरांमध्ये या वास्तुंविषयी आस्था निर्माण करणे आदी प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे. इको-प्रो चे ‘चंद्रपूर किल्ला-परकोट स्वच्छता अभियान’ हे एका संस्थेचे नसून सर्व चंद्रपूरकरांनी सहभागी व्हावे व सर्वोतोपरी मदत करावी, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
परकोटावर चढून सफाई
परकोटाची भिंत चंद्रपूर शहराच्या सभोवताल सात किलोमीटर लांबीची बांधण्यात आलेली आहे. परकोट दगडांनी सरळ उभा बांधण्यात आला आहे. त्यावर चढून झाडे तोडणे कठिण आहे. त्यामुळे इको-प्रोचे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी गिर्यारोहकाप्रमाणे दोर बांधून झाडे तोडणे सुरू केले आहे. शिवाय झुडपे तोडण्यासाठी विशेष शिडी (निशानी) बनविली आहे. इको-प्रोचे स्वयंसेवक उत्स्फूर्तपणे चंद्रपूरच्या पुरातत्वीय ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी पुढे आले आहेत.
पुरातत्त्व विभागाकडून फेरउभारणी
परकोटाची पडझड सुरू असल्याने पुरातत्त्व विभागाने काही भागात फेरउभारणी सुरू केली आहे. पठाणपुरा भागात परकोटाची नवीन दगडांची भिंत उभारली जात आहे. ५० मीटरचे काम पूर्ण झाले आहे. परंतु ते काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. कोरण्यासाठी दगड पडलेले आहेत. भिंतीच्या बांधकामासाठी आणलेला चुन्याची पोती झाकून ठेवण्यात आली आहेत.