इलेक्ट्रिक सिमेंट पोल भरलेला ट्रॅक्टर उलटला; दोघांचा मृत्यू, एक गंभीर
By साईनाथ कुचनकार | Published: May 19, 2023 05:12 PM2023-05-19T17:12:34+5:302023-05-19T17:12:56+5:30
अपघातस्थळी पोहोचलेल्या ठेकेदाराला हृदयविकाराचा तीव्र झटका : पिपरी दीक्षित गावाजवळची घटना
चंद्रपूर: पोंभूर्णा तालुक्यातील चेक घोसरी येथून चेक बेंबाळ या गावाला ट्रॅक्टरने इलेक्ट्रिक सिमेंट पोल नेत असताना पिपरी दीक्षित गावाजवळ ट्रॅक्टर ट्राली उलटली. या अपघातात दोन मजुुरांचा मृत्यू झाला, तर एक गंभीर जखमी झाला. दरम्यान, ट्रॅक्टरच्या मागे दुचाकीने येत असलेल्या ठेकेदाराने अपघात बघताच हृदयविकाराचा तीव्र झटका आला. ही घटना शुक्रवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास घडली. अपघातात मिथुन पांडुरंग मराठे (३५), अंकित राजू गंद्देशिवार (३०, दोघेही रा.केळझर) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर ईश्वर मंडरे (३४) गंभीर जखमी झाले. हृदयविकाराचा झटका आलेले ठेकेदार सुभाष रणदिवे (४४) या दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
चेक बेंबाळ गावात इलेक्ट्रिक सिमेंट पोलचे काम करण्याकरिता चेक घोसरी येथून ट्रॅक्टरच्या साहाय्याने सहा सिमेंटचे पोल नेण्यात येत होते. या ट्रॅक्टरमध्ये पाच मजूर तसेच चालक बसून होते. पिपरी दीक्षित गावाजवळ चेक बेंबाळ रोडवर ट्रॅक्टर ट्राली उलटली. यामध्ये सिमेंट पोल मजुरांच्या अंगावर पडले. या घटनेमध्ये मिथुन पांडुरंग मराठे (३५), अंकित राजू गंद्देशिवार (३०) दोघेही रा. केळझर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर ईश्वर मंडरे (३४, रा. केळझर) हा गंभीर जखमी झाला. दरम्यान, ट्रॅक्टरच्या मागे दुचाकीने येत असलेले ठेकेदार सुभाष रणदिवे (४४, रा. केळझर) अपघातस्थळी पोहोचताच अपघात बघून त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. या दोघांना तात्काळ पोंभूर्णा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दोघांचीही प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तात्काळ चंद्रपूरला हलविण्यात आले, तर ट्रॅक्टरचालक आशिष निकोडे, विनोद मराठे, गुरुदास सातरे हे किरकोळ जखमी झाले असून, त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांना पंचनामा केला असून, पुढील तपास सुरू केला आहे.