पारंपरिक पिकांनी दगा दिला; मग केली ड्रॅगन फ्रूट शेती, एकाच रोपापासून मागील वर्षी अन् यंदाही लाखोंचे उत्पन्न
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2023 11:33 AM2023-08-18T11:33:34+5:302023-08-18T11:35:03+5:30
या फळांमध्ये औषधी गुणधर्म असल्यामुळे फळाला चांगली मागणी
प्रवीण खिरटकर
वरोरा (चंद्रपूर) : पारंपरिक शेती मागील अनेक वर्षांपासून दगा देत होती. सततच्या नापिकीने तो कंटाळला होता. अशातच दोन वर्षांपूर्वी त्याने यूट्यूबवरून ड्रॅगन फ्रुट लागवडीबाबत धडे घेतले. त्याला कृषी विभागाची साथ मिळाली. मागील वर्षी या युवा शेतकऱ्याने ड्रॅगन फळापासून लाखो रुपयांचे उत्पादन घेतले. यावर्षी पुन्हा फळे निघणे सुरू झाले आहे. त्यामुळे त्याच रोपापासून यावर्षीही या युवकास आणखी लाखो रुपयांचे उत्पादन मिळण्याची आशा आहे.
वरोरा तालुक्यातील शेगाव कृषी मंडळांतर्गत येणाऱ्या आबमक्ता येतील पदवीधर शेतकरी मनीष मारोतराव पसारे असे या प्रगोगशील युवा शेतकऱ्याचे नाव आहे. त्याने यूट्यूबच्या माध्यमातून ड्रगन फळाबाबत माहिती घेतली. शेतात ड्रॅगन फळ लावण्याचा निश्चय केला. ही बाब शेगाव मंडळ कृषी अधिकारी विजय काळे यांना सांगितली. त्यांनी मनीष पसारे यांना मार्गदर्शन केले.
दोन वर्षांपूर्वी लातूर जिल्ह्यातील सांगोला येथून दीड लाख रुपये खर्च करून त्याने रोपे आणली. एक एकर शेतात बेड तयार करून त्याची लागवड केली. ठिबक पद्धतीने पिकाला पाणी दिले. ड्रॅगन फ्रुट उष्ण वातावरणात वाढत असल्यामुळे लागवडीनंतर एका वर्षात फळे आली. या फळांमध्ये औषधी गुणधर्म असल्यामुळे फळाला चांगली मागणी आहे. मागील वर्षी त्याने आपल्या आनंदवन चौकातील हार्डवेअरच्या दुकानातून फळाची एक लाखापेक्षा अधिक विक्री केली.
त्याच झाडांना यंदाही लागली फळे
यावर्षी सुरुवातीला अधिक पाऊस झाल्याने फळाची प्रतवारी थोडी खराब झाली होती. परंतु, सध्या पाऊस नसल्याने फळाची प्रतवारी चांगली असून चांगली फळे निघत आहेत. यावर्षीसुद्धा या शेतकऱ्यास त्याच झाडांपासून लाखो रुपयांचे उत्पादन मिळणार आहे.
१५ वर्षे राहतात झाडे
ड्रॅगन वेलाची एकदा लागवड केल्यानंतर त्याची छाटणी पद्धतशीर करीत राहिले तर १५ वर्षांपर्यंत दुसरी रोपे लावण्याची गरज भासत नाही. त्याच्यावरच दरवर्षी उत्पन्न मिळत राहते, हे विशेष. ड्रॅगन फ्रुट हार्ट अटॅक, मधुमेह आजाराकरिता गुणकारी आहे. एका ड्रॅगन फ्रुटमध्ये कॅलरी, कार्बोहायड्रेट, प्रथिने, लोह, मॅग्नेशियम हे पोषक घटक असतात.