पारंपरिक गोणपाट व्यवसाय डबघाईस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 10:45 PM2019-04-12T22:45:11+5:302019-04-12T22:45:34+5:30
शेतात मळणी करून धान्य घरी आणण्यासाठी वापरात येणारा ‘गोणपाट’ निर्मितीचा पोंंभूर्णा येथील व्यवसाय दुर्लक्षितपणामुळे संकटात सापडला आहे.
विराज मुरकुटे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पोंभूर्णा : शेतात मळणी करून धान्य घरी आणण्यासाठी वापरात येणारा ‘गोणपाट’ निर्मितीचा पोंंभूर्णा येथील व्यवसाय दुर्लक्षितपणामुळे संकटात सापडला आहे.
पेशव्यांच्या काळापासून नागपूर, सोलापूर, जालना, शहापूर ही ठिकाणे वस्त्रोद्योगासाठी प्रसिद्ध आहेत. या उद्योगांना स्वातंत्र्यपूर्व काळात राजाश्रय होता. परंतु ब्रिटिशांच्या काळात हे हस्त व्यवसाय बसले. ब्रिटिशांच्या आकर्षक वस्तू व कमी किंमत यामुळे स्थानिक कारागिरांच्या वस्तूला उठाव राहिला नाही. तरीही स्थानिक पातळीवर चालणाऱ्या दैनंदिन व्यवसायात उपयोगी पडणाºया वस्तूंची निर्मिती मात्र ग्रामीण भागात सुरूच होती. पोंभूर्णा येथे हातमाग मांगठा हा पारंपरिक व्यवसाय स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरूच आहे.
१९३० ते १९४० च्या दशकात अनेक दलित कुटुंबांनी उदरनिर्वाहाचे साधन म्हणून परंपरागत लुगडे विनण्याचा घरगुती व्यवसाय सुरू केला. त्यानंतर ‘नेवार’ विनणे सुरू झाले. पण काही कालावधीने तेही बंद झाले. त्यानंतर गोणपाट तयार करण्याचे व्यवसाय येथे सुरू झाले. पिकाची कापणी, शेतात मळणी करून रास घरी आणण्यासाठी गोणपाटाचा उपयोग केला जातो. बैलगाडीत मावेल एवढी जाड कापडाची एक मोठी पिशवीच असते. तिला गोणपाट म्हणतात. तिच्या साहाय्याने धान्य ढोलीत सुरक्षित ठेवले जाते. पण आता अनेक शेतकऱ्यांनी मळणीच्या प्रक्रिया बदलवल्याने गोणपाट वापराऐवजी पोत्यांचा वापर सुरू झाला आहे. त्यामुळे हा व्यवसाय संकटात सापडला आहे. गोणपाट तयार करण्याच्या कामात दलित समाजाची तिसरी पिढी गुंतली आहे. चार महिन्यांची शेती केल्यानंतर उर्वरित काळात गोणपाट तयार करतात. दलित समाजाची ५० कुटुंबे या व्यवसायात गुंतली आहेत.
अनुदान नाही, कर्जही नाही
अजूनही विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, आंध्रातील काही सीमावर्ती भागात या गोणपाटाची विक्री चालू आहे. उन्हाळाभर हे कार्य चालू असते. परंतु साहित्याच्या किंमतीत वाढ झाल्याने हा व्यवसाय परवडेनासा झाला आहे. विदर्भात पोंभूर्णा हे तालुक्याचे गाव ‘गोणपाट’ निर्मितीसाठी प्रसिद्द असले तरी शासनाकडून कोणत्याच प्रकारची आर्थिक मदत या व्यवसायाला मिळत नसून बँकसुद्धा कर्ज देत नाही.