चंद्रपुरात पुन्हा वाहतूक कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 10:33 PM2018-10-27T22:33:56+5:302018-10-27T22:34:45+5:30

चंद्रपूर शहराला महानगरपालिकेचा दर्जा मिळाला आहे. लोकसंख्येसह वाहनांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. मात्र त्या तुलनेत रस्त्यांचे रुंदीकरण मात्र झालेले नाही. रस्ते रुंद करा, अशीे ओरड करून चंद्रपूरकर थकले आहेत.

Traffic again in Chandrapur | चंद्रपुरात पुन्हा वाहतूक कोंडी

चंद्रपुरात पुन्हा वाहतूक कोंडी

Next
ठळक मुद्देदिवाळीची वर्दळ वाढली : रस्त्यावर, बाजारपेठेत वाहनेच वाहने

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर शहराला महानगरपालिकेचा दर्जा मिळाला आहे. लोकसंख्येसह वाहनांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. मात्र त्या तुलनेत रस्त्यांचे रुंदीकरण मात्र झालेले नाही. रस्ते रुंद करा, अशीे ओरड करून चंद्रपूरकर थकले आहेत. मात्र मनपा गंभीर नाही. त्यामुळे चंद्रपुरातील विस्कळीत वाहतूक व्यवस्था मागील अनेक वर्षात सुरळीत होऊ शकली नाही. आता दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावर, बाजारपेठेत वर्दळ वाढली आहे. त्यामुळे प्रत्येक रस्त्यावर होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीमुळे चंद्रपूरकरांचा जीवही मेटाकुटीस आला आहे.
चंद्रपूर शहराची लोकसंख्या साडेचार लाखापर्यंत पोहचली आहे. चारचाकी व दुचाकींची संख्याही लाखोंच्या घरात आहे. चंद्रपूर शहर मोठे असले तरी येथील मुख्य बाजारपेठ महात्मा गांधी व कस्तुरबा गांधी मार्गालगतच आहे. त्यामुळे महात्मा गांधी व कस्तुरबा गांधी मार्ग हे मुख्य रस्ते समजले जातात. या मार्गावरून वाहने जातात आणि परतही येतात. त्यामुळे या मार्गावर नेहमीच वर्दळ असते. सायंकाळच्या सुमारास तर ही वर्दळ आणखी वाढते. वाहनांचे आवागमन या मार्गावरून अधिक असले तरी त्या तुलनेत पार्किंग झोन उपलब्ध नाहीत. वाहनांची संख्या झपाट्याने वाढल्यामुळे किमान जिथे वाहनांचा सर्वाधिक संपर्क येतो, त्या महात्मा गांधी व कस्तुरबा मार्गांना रुंद करणे गरजेचे आहे. चंद्रपुरात मनपा झाली तरी हे मार्ग रुंद होऊ शकले नाही. उलट अतिक्रमणामुळे अरुंदच होत चालले आहे. वास्तविक नगररचनेत हे दोन मार्ग ८० फुटापर्यंत रुंद असल्याची माहिती आहे.
आता दिवाळी तोंडावर आली आहे. दिवाळीनिमित्त नागरिकांची खरेदारी सुरू झाली आहे. रस्त्यावर, बाजारपेठेत वाहनेच वाहने दिसू लागली आहेत. त्यामुळे येथील महात्मा गांधी मार्ग, मिलन चौक, जटपुरा गेट चौक, स्टेट बँक परिसर, गोकुल गल्ली, गंजवार्ड, रघुवंशी कॉम्प्लेक्स समोर,गोल बाजार, बिनबा रोड, गांधी चौक या मुख्य ठिकाणासह शहरात अनेक ठिकाणी वाट्टेल तिथे वाहने पार्क केलेली आढळतात. त्यामुळे एखादे चारचाकी वाहन आल्यास वाहतुकीची कोंडी निर्माण होते.
छोटाबाजार ते जटपुरा गेट १५ मिनिटे
येथील जटपुरा गेट वाहतूक कोंडीचे मुख्य कारण ठरत आहे. रस्त्यावरील वाहने वाढली की जटपुरा गेटवर वाहतुकीची कोंडी झालीच समजा. ंछोटाबाजार ते जटपुरा गेटपर्यंत खचाखच वाहने जमा झाली असतात. त्यामुळे छोटाबाजारपासून जटपुरा गेटबाहेर वाहन काढताना तब्बल १५ मिनिटाचा वेळ लागतो. त्यामुळे चंद्रपूरकर त्रस्त झाले आहेत. ं
‘पे अ‍ॅण्ड पार्क’कडे नागरिकांची पाठ
शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी, यासाठी महापालिकेने शहरातील पाच ठिकाणी पार्किंग झोन निर्माण करून ‘पे अ‍ॅण्ड पार्क’ योजना सुरू केली. मनपा कार्यालयाजवळ, गांधी चौकातील पश्चिम दिशेला, जुन्या महात्मा गांधी शाळेजवळ, जुन्या राजे धर्मराव प्राथमिक शाळेजवळ आणि रघुवंशी कॉम्प्लेक्समधील बेसमेंट या ठिकाणी मनपाने पार्र्कींग झोन निर्माण करून पे अ‍ॅण्ड पार्क योजना सुरू केली आहे. दुचाकी वाहनासाठी तीन तासाकरिता १० रुपये व चारचाकी वाहनासाठी तीन तासाकरिता २० रुपये शुल्क आकारले जात आहे. व्यापारी सकाळी दुकान उघडतात आणि रात्री बंद करून घरी जातात. या ठिकाणी वाहन ठेवले तर त्यांना दहा तासांचे पैसे द्यावे लागतात. हे शुल्क अधिक असल्याने हे पार्र्कींग झोन ओस पडल्याचे दिसत आहे.
रस्ते रुंदीकरणात अडचण काय?
मागील अनेक वर्षांपासून चंद्रपूरकर वाहतूक समस्येमुळे त्रस्त आहेत. चंद्रपुरातील महात्मा गांधी मार्ग व कस्तुरबा मार्ग हे प्रमुख मार्ग आहे. या मार्गावरून चंद्रपुरातील निम्म्याहून अधिक वाहनांची आवागमन होत असते. त्यामुळेच वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. ही डोकेदुखी चंद्रपुरातील प्रत्येक व्यक्ती, अधिकारी, कर्मचारी अनुभवत असला तरी यावर उपाययोजना नाही. वास्तविक टाऊन प्लॅननुसार हे रस्ते केव्हाच रुंद व्हायला हवे होते. मात्र या रस्त्याच्या रुंदीकरणाला मनपाला कुठली अडचण येत आहे, हेच कळायला मार्ग नाही.

Web Title: Traffic again in Chandrapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.