राजुरा शहरात वाहतुकीची कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:28 AM2021-09-25T04:28:46+5:302021-09-25T04:28:46+5:30
राजुरा : राजुरा शहरातील पार्किंग व्यवस्थेत वाहने पार्किंग न करणाऱ्या व दुचाकीवरून तीनजण बसवून फिरणारे, गाडीला नंबरप्लेट नसणाऱ्या, वेगाने ...
राजुरा : राजुरा शहरातील पार्किंग व्यवस्थेत वाहने पार्किंग न करणाऱ्या व दुचाकीवरून तीनजण बसवून फिरणारे, गाडीला नंबरप्लेट नसणाऱ्या, वेगाने गाडी चालवत स्टंट मारणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्यात यावी, यासाठी गुरुवारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष स्वप्नील बाजुजवार यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक चंद्रशेखर बाहदुरे यांना निवेदन देण्यात आले.
राजुरा शहरातील नाका नंबर ३, नागराज कॅफे, हॉटेल फूड जंक्शन, पंचायत समिती चौक व शहरातील वर्दळीच्या ठिकाणी दुचाकी व चारचाकी वाहने पार्किंग व्यवस्थेमध्ये उभी न करता वाहनचालक भररस्त्यात उभी करत असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. तसेच गाडीला नंबरप्लेट नसणे, ट्रीपल सीट गाडी चालविणे, वेगाने गाडी चालवत स्टंटबाजी करणे, वाहतूक परवाना नसणे अशा अनेक समस्या वाहतुकीसंदर्भात असून, अशांवर नियमानुसार तत्काळ कारवाई करण्यात यावी. वाहतूक व्यवस्थेमुळे कुठलाही अपघात, अनुचित प्रकार घडल्यास सर्वस्वी पोलीस प्रशासन जबाबदार असेल, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष देरकर, शहराध्यक्ष रखीब शेख, युवक तालुकाध्यक्ष आसिफ सय्यद व कार्यकर्ते उपस्थित होते.