रस्त्याचा काही भाग वाहून गेल्याने वाहतूक ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:32 AM2021-09-22T04:32:00+5:302021-09-22T04:32:00+5:30
संततधार पावसामुळे वरोरा-चिमूर मार्ग बंद वरोरा : मागील चार वर्षांपासून वरोरा-चिमूर मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम रखडल्याने नागरिकांना अनेक समस्यांना तोंड ...
संततधार पावसामुळे वरोरा-चिमूर मार्ग बंद
वरोरा : मागील चार वर्षांपासून वरोरा-चिमूर मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम रखडल्याने नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. सोमवारी झालेल्या संततधार पावसामुळे या मार्गावरील रस्त्याचा काही भाग वाहून गेला आणि वाहतूक ठप्प झाली.
वरोरा-चिमूर या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे कंत्राट एस. आर. के. कंपनीला देण्यात आलेले आहेत. मागील चार वर्षांपासून हे काम सुरू असून अजूनही पूर्णत्वास गेले नाही. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेकदा अपघात झाले असून अनेकांना आपला जीवसुद्धा गमवावा लागला आहे. या मार्गावरील शेतामध्ये धुळीचे साम्राज्य असून त्यामुळे पिकांचे नुकसान झाले, याबाबत अनेकदा आंदोलने सुद्धा करण्यात आली. मात्र त्याला केराची टोपली दाखवित कंपनीने त्या कामाची पद्धती बदलली नाही.
काही दिवसांपूर्वी या रस्त्यावरील एक पूल वाहून गेला होता. आता सोमवार आणि मंगळवारला झालेल्या संततधार पावसामुळे भेंडाळा गावानजीक असलेल्या निर्माणाधीन रस्त्याचा काही भाग वाहून गेल्याने हा संपूर्ण रस्ता जलमय झाला आहे. मंगळवारी या रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसही यामुळे अडल्या आणि रस्त्यावरील पाणी शेतात शिरल्याने पिकांचे नुकसान झाले. वरोरा ते चिमूर या रस्त्यावर अनेक गावे असून या ठिकाणच्या नागरिकांना ये जा करण्यासाठी हा एकमेव मार्ग असल्यामुळे त्यांची अडचण झाली आहे. हा पूल आणि रस्ता तातडीने दुरुस्त न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा चारगाव खुर्दचे सरपंच राजेंद्र चिकटे यांनी दिला आहे.