पूल दबल्याने वाहतूक बंद
By admin | Published: April 6, 2015 01:19 AM2015-04-06T01:19:46+5:302015-04-06T01:19:46+5:30
मूल तालुका मुख्यालयाशी जोडणाऱ्या भेजगावजवळील उमा नदीवरील पूल दबल्याने वाहतुकीस धोका निर्माण झाला
बससेवा बंद : नागरिक, विद्यार्थ्यांना त्रास; बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
भेजगाव : मूल तालुका मुख्यालयाशी जोडणाऱ्या भेजगावजवळील उमा नदीवरील पूल दबल्याने वाहतुकीस धोका निर्माण झाला आहे. परिणामी या मार्गावरील परिवहन महामंडळाच्या बसफेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे परिसरातील प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.
पुलाला मधोमध भेगा जाऊन पूल दबला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक प्रभावित झाली आहे. भेजगाव व हळदी या दोन गावांच्या सीमेवरून वाहणाऱ्या उमा नदीवर जवळपास ३० वर्षापूर्वी पूल बांधण्यात आले. मात्र दरवर्षीच्या पावसाळ्यात हा पूल पाण्याखाली राहत असल्याने मोठमोठे भगदाड पडले आहेत. दरवर्षी बांधकाम विभागाकडून पुलाची डागडुगी करून रस्ता मोकळा करून दिला जाते. मात्र यावेळी भर उन्हाळ्यात पूल दबला असून जि.प. बंधकाम विभागाने पूल दुरूस्तीच्या कोणत्याही हालचाली न केल्याने नागरिकांत रोष पसरला आहे. ऐन परीक्षेच्या कालावधीतच पूल दबल्याने वाहतूक बंद झाली. याचा त्रास महाविद्यालयीन युवक-युवतींना सोसावा लागत आहे.
मूल हे तालुक्याचे ठिकाण असल्याने भेजगाव परिसरातील विद्यार्थी महाविद्यालयीन शिक्षण घेण्याकरिता मूल येथे जातात. मात्र पूल दबल्याने बसफेऱ्या बंद आहेत. पुलावरून वाहतूक करताना केव्हाही मोठा अपघात घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना चार-पाच किमी पायदळ जाऊन समोर आॅटोनी प्रवास करावा लागत आहे. यात विद्यार्थ्यांचा वेळ वाया जात असून मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
भेजगाव परिसरातील १५ गावांना या पूलाने तालुक्याला जोडले आहे. या पुलावरून मोठ्या प्रमाणात रहदारी सुरू असते. मात्र लोकप्रतिनिधींची पोकळ आश्वासने व प्रशासनाच्या दुर्लक्षीतपणाचे ग्रहण या पुलाला लागल्याने या रस्त्यावरील वाहतूक आता बंद पडली आहे.
गेल्या कित्येक दिवसांपासून पूलाची उंची वाढविण्याची मागणी आहे. मात्र या पुलाची उंची वाढलेली नाही.
बांधकाम विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन या पुलाची दुरूस्ती तत्काळ करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)