रेती तस्करीची वाहने पकडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 11:21 PM2018-05-16T23:21:26+5:302018-05-16T23:21:49+5:30
अवैधरित्या रेतीचे खनन करून तस्करी करणाऱ्या दहा वाहनांना कोरपन्याचे तहसीलदार हरीश गाडे व पथकाने पकडले. ही कारवाई बुधवारी करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
कन्हाळगाव : अवैधरित्या रेतीचे खनन करून तस्करी करणाऱ्या दहा वाहनांना कोरपन्याचे तहसीलदार हरीश गाडे व पथकाने पकडले. ही कारवाई बुधवारी करण्यात आली.
तहसीलदारांच्या या कारवाईमुळे रेती तस्करांचे धाबे दणाणले आहे. पकडलेल्या दहा वाहनातील नऊ वाहनात रेती तर एका वाहनात गिट्टी भरून असल्याचे आढळून आले. यातील तीन वाहने कोरपना तर सात वाहने नारंडाजवळ पकडण्यात आली. सध्या कोरपन्याचे तहसीलदार हरीश गाडे यांनी अवैध गौण खनिज खननाविरुध्द धडम मोहीम सुरू केली आहे. या अंतर्गत बुधवारी कोरपना, नारंडा परिसरात गस्त सुरू असताना सदर वाहने पकडण्यात आली. यात कोरपना पोलिसांचेही सहकार्य घेण्यात आले. सदर कारवाई तहसीलदार हरीश गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी चव्हाण, तलाठी कमलवार, मडावी यांनी केली. रेती तस्करीतील वाहने कोरपना तहसील कार्यालयापुढे जप्त करून ठेवण्यात आली आहे. अशा कारवायामुळे अवैध रेती तस्करीवर आळा बसत आहे.
महसुलात वाढ
तहसीलदार हरीश गाडे यांनी वर्षभरात केलेल्या धडक मोहिमेमुळे एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ या एक वर्षाच्या कालावधीत कोरपना तहसील कार्यालयाच्या महसुलात विक्रमी वाढ झाली आहे. वर्षभरात ५९ विविध प्रकरणामधे तब्बल १७ लाख ५३ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तहसीलदार गाडे हे रुजू झाल्यापासून कोरपना तहसील कार्यालयाच्या कामकाजातही मोठी गतिमानता प्राप्त झाली आहे. त्यांच्या मार्गदर्शनखाली विविध गावात महसूल विभागातर्फे शिबिर लावून प्रमाण पत्रे वितरित करण्यात आली. त्यामुळे नागरिकातही समाधानाचे वातावरण आहे.