कोरपना तालुक्यात रेतीची तस्करी
By admin | Published: January 4, 2015 11:09 PM2015-01-04T23:09:10+5:302015-01-04T23:09:10+5:30
तालुक्यात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी होत असताना महसूल विभाग जाणिवपूर्वक याकडे डोळेझाक करीत आहे. दररोज नदीपात्रातून अंदाजे ५० ते १०० ट्रॅक्टरद्वारे अनधिकृतपणे रेती वाहून नेली जात आहे.
कोरपना: तालुक्यात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी होत असताना महसूल विभाग जाणिवपूर्वक याकडे डोळेझाक करीत आहे. दररोज नदीपात्रातून अंदाजे ५० ते १०० ट्रॅक्टरद्वारे अनधिकृतपणे रेती वाहून नेली जात आहे.
तालुक्यातील कोडशी, परसोडा, कोडोळा येथील नदीपात्रातील रेती चांगल्या दर्जाची असल्याने या रेतीची मागणी यवतमाळ जिल्हा, आदिलाबाद-चंद्रपूर अशा तीन जिल्ह्यात आहे. त्यामुळे रेतीमाफियांचा या घाटांवर डोळा आहे. महसूल विभागाच्या डोळ्यात धूळ झोकून २४ तास नदी पात्रातील वाळूचे उत्खनन सुरू असते. महसूल विभागाच्या आर्शिवादाने रेती तस्कर चांगलेच गब्बर झाले असून आपले कोणीच करु शकत नाही. अशा आविर्भावात ते वावरत आहेत.
शासनाकडून अद्याप कोणत्याही रेतीघाटाचा लिलाव झाला नाही. रेतीघाटांचा लिलाव झाल्यास अनधिकृत रेती वाहतुकीला आळा बसणार आहे.
सध्या सुरू असलेल्या रेतीच्या तस्करीमुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रकार येथे सुरू आहे. शासनाकडून रेतीघाटांच्या लिलावाला दरवर्षी विलंब होतो. त्यामुळे लाखो रुपयांची रेती लंपास केली जाते. तसे न होता लाखो रुपयांची रेती चोरी गेल्यानंतरच त्या घाटाचा लिलाव होतो. त्यामुळे शासनाचा लाखोे रुपयांचा महसूल बुडतो. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे तस्करांवर कारवाई केल्यास शासनाच्या महसुलात वाढ होऊ शकते.
मात्र महसूल विभागाचे अधिकारी वैयक्तिक महसूल वाढविण्यावर भर देत आहेत. आळी-मिळी गुपचिळी, असाच एकंदर प्रकार सुरू आहे. तालुक्यातील कोडशी, वोडोळा, परसोडा, अंतरगाव, सांगोळा, भोयगाव अशा अनेक या ठिकाणाहून दररोज महसूल विभागाच्या आशीर्वादाने रेतीची खुलेआम तस्करी केली जात आहे. रेती तस्कर प्रत्येक ट्रॅक्टरमागे संबंधित अधिकाऱ्यांना ठरावीक रक्कम मिळत असल्याने हे अधिकारी या तस्करीकडे कानाडोळा करीत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. (शहर प्रतिनिधी)