लढवय्या नेतृत्वाचा दुःखद अंत मनाला प्रचंड वेदना देणारा - विजय वडेट्टीवार
By साईनाथ कुचनकार | Published: May 30, 2023 03:15 PM2023-05-30T15:15:16+5:302023-05-30T15:17:15+5:30
निधनाचे वृत्त समजताच मन सुन्न झाले : काँग्रेस पक्षाचे सर्वसमावेशक आणि लढवय्या असे नेतृत्व
चंद्रपूर : आर्णी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांच्या निधनाचे वृत्त समजताच मन सुन्न झाले. गेल्या तीन दिवसांपूर्वी त्यांना पितृशोक झाला. पितृशोकाच्या दुःखाच्या डोंगरातून सावरण्यापूर्वीच खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने त्यांना दिल्ली येथे हलविले. अतिशय जिगरबाज व लढाऊ वृत्तीचे असल्याने ते नक्कीच आरोग्य तक्रारीच्या विळख्यातून बाहेर पडून पुन्हा स्वस्थ होणार, अशी आशा होती. मात्र, नियतीने काळाचा घाला घालत धानोरकर कुटुंबीयांवर पुन्हा आघात केला. महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाचे एकमेव खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांचे निधन झाले. जिल्ह्याच्या राजकारणामध्ये काँग्रेस पक्षाचा लढवय्या शिपाई म्हणूनही त्यांची ओळख होती. जनतेच्या हितासाठी राबणारा नेता अचानक आपल्यातून गेल्याने काँग्रेस पक्षासह जिल्ह्याच्या सर्वसामान्यांमध्ये प्रचंड शोककळा पसरली आहे.
चंद्रपूर -आर्णी लोकसभा क्षेत्राचे खासदार बाळू धानोरकर यांचे निधन म्हणजे मनाला दुःखद वेदना देणारी व काळजाला चटका लावणारी घटना आहे. त्यांच्या निधनाने काँग्रेस पक्षासह जिल्ह्याच्या राजकारणाची मोठी हानी झाली. आम्ही धानोरकर कुटुंबीयांच्या पाठीशी असून या दुःखातून सावरण्यासाठी धानोरकर कुटुंबीयांना बळ मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
वडेट्टीवार यांनी या शब्दात दु:ख व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्यासह इतर राजकीय नेत्यांनीही आपले दु:ख व्यक्त केले आहे.
चंद्रपूर लोकसभा क्षेत्राची मोठी हानी - सुधीर मुनगंटीवार
चंद्रपूर, आर्णी व वणी लोकसभा मतदार संघाचे खासदार सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर यांच्या निधनाचे वृत्त दु:खद व धक्कादायक आहे. त्यांच्या निधनाने चंद्रपूर लोकसभा क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशी शोकसंवेदना राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.
‘खासदार धानोरकर यांच्या निधनाचे वृत्त वेदनादायी आहे. लोकहितासाठी आक्रमक भूमिका घेणारे, अशी खासदार धानोरकर यांची ओळख होती. दिल्ली येथील मेदांता रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. तीनच दिवसांपूर्वी म्हणजे २७ मे रोजी खासदार धानोरकर यांच्या वडिलांना देवाज्ञा झाली. त्यानंतर आज धानोरकर यांच्या अकाली जाण्याने त्यांच्या परिवारावर जो दु:खाचा डोंगर कोसळला आहे, त्यातून त्यांना सावरण्याची प्रार्थना माता महाकाली चरणी करतो’, अशा शब्दात ना. मुनगंटीवार यांनी धानोरकर यांच्या प्रति श्रद्धांजली व्यक्त केली.
दूरदृष्टीचा लढवय्या नेता बाळूभाऊ धानोरकर - नरेश पुगलिया
कुशल संघटक, विकासाची जाण असणारा दिलदार स्वंयभू नेता बाळू धानोरकर यांच्या आकस्मिक निधनामुळे चंद्रपूर तसेच विदर्भाचे मोठे नुकसान झाले. एक कर्तबगार नेता आम्ही गमावला. यामुळे काँग्रेस पक्षाचे व आमदार प्रतिभा धानोरकर परिवाराची मोठी हानी झाली आहे. त्यांना या संकटातून सावरण्याची ईश्वर शक्ती देवो हीच भावपूर्ण श्रद्धांजली, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार नरेश पुगलिया यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या.
ओबीसींचा चेहरा, काँग्रेसचा लढवय्या नेता हरवला - सुभाष धोटे
खासदार बाळू धानोरकर हे चंद्रपूर जिल्ह्यासाठीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी भूषणावह होते. ते ओबीसी समाज आणि परिसरातील सर्वसामान्य जनतेचा चेहरा बनून क्षेत्रात विकासासाठी झटत होते. चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेसच्या अनेक वर्षांपासूनच्या अपयशाला मिटवून त्यांनी गरूडझेप घेत विजयश्री खेचून आणली. त्यांच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाला सर्वसमावेशक आणि लढवय्या असे नेतृत्व लाभले. पक्ष बांधणी, पक्ष बळकटीसाठी आणि विस्तारासाठी त्यांनी परिश्रम घेतले. त्यांच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाला आणि या क्षेत्राला प्रगतीचा आणखी बराच मोठा टप्पा पार करायचा होता. मात्र, दुर्दैवाने खासदार बाळू धानोरकर कुणाला काही कळायच्या आत त्यांच्यावर काळाने घाला घातला. त्यांच्या निधनाने काँग्रेसचा एक अतिशय हुशार, युवा, तडफदार नेता, ओबीसी आणि सर्व समावेशक चेहरा, लढवय्या नेता हरवला. त्यांच्या निधनाने राजकीय, सामाजिक क्षेत्रात निर्माण झालेली ही पोकळी कधीही भरून न निघणारी आहे.