घरकुलाच्या धनादेशासाठी लाभार्थ्यांची भटकंती
By admin | Published: April 5, 2015 01:30 AM2015-04-05T01:30:26+5:302015-04-05T01:30:26+5:30
इंदिरा आवास योजनेअंतर्गत तालुक्यातील लाभार्थ्यांचे घरकूल बांधकाम पूर्ण होऊनसुद्धा बिले देण्यास टाळाटाळ केली जात असून बिले काढण्यासाठी पैशाची मागणी होत...
जिवती : इंदिरा आवास योजनेअंतर्गत तालुक्यातील लाभार्थ्यांचे घरकूल बांधकाम पूर्ण होऊनसुद्धा बिले देण्यास टाळाटाळ केली जात असून बिले काढण्यासाठी पैशाची मागणी होत असल्याचा आरोप घरकूल लाभार्थ्यांकडून केला जात आहे.
शासनाने दारिद्रय रेषेखालील कुटुंबाना निवाऱ्याची सोय व्हावी, यासाठी इंदिरा आवास योजना, रमाई आवास योजनेअंतर्गत असंख्य लाभार्थ्यांना घरकूल मंजुर करून दिले. त्याचे कामही पुर्ण झाले. घरकुलाचे काम पुर्ण झाले असेल तर संबंधित अभियंत्याकडून पाहणी करून घरकुलाची बिले टाकली जातात. मात्र काम झाल्यानंतरही बिले देण्यास संबंधित यंत्रणेकडून टाळाटाळ केली जात असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. लवकर बिले काढायची असेल तर पैसे द्यावे लागतात. तेव्हाच बिले मिळतील, असा सल्लाही काही अभियंत्याकडून मिळत असल्याचे बोलले जात आहे. संबंधीत कामाची बिले मिळावी, यासाठी लाभार्थी वारंवार पंचायत समितीचे उंबरठे झिजवित आहेत. त्यात त्यांचे आर्थिक नुकसान होत असून मानसिक त्रासही भोगावा लागत आहे. संबंधीत घरकूल लाभ्यार्थ्यांची चौकशी करून त्यांना कामाची बिले त्वरित दिली जावी, अशी मागणी घरकुल लाभार्थ्यांकडून केली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)