रेल्वे मार्ग पूर्ण झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही
By admin | Published: June 23, 2014 11:47 PM2014-06-23T23:47:11+5:302014-06-23T23:47:11+5:30
चिमूर-गडचिरोली लोकसभा क्षेत्राचा विकास साधायचा असेल तर नागभीड- नागपूर ही ब्रॉडगेज रेल्वे लाईन आणि वडसा गडचिरोली हा नवीन रेल्वे मार्ग होणे गरजेचे आहे आणि हे दोन्ही मार्ग पूर्ण झाल्याशिवाय
अशोक नेते : रेल्वे बजेटपूर्वी घेणार रेल्वेमंत्र्यांची भेट
नागभीड : चिमूर-गडचिरोली लोकसभा क्षेत्राचा विकास साधायचा असेल तर नागभीड- नागपूर ही ब्रॉडगेज रेल्वे लाईन आणि वडसा गडचिरोली हा नवीन रेल्वे मार्ग होणे गरजेचे आहे आणि हे दोन्ही मार्ग पूर्ण झाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही चिमूर- गडचिरोलीचे खासदार अशोक नेते यांनी येथे एका पत्रकार परिषदेत दिली.
या दोन्ही मार्गाच्या अडचणी काय आहेत हे जाणून घेण्यासाठी खासदार नेते यांनी नागपूर विभागातील प्रमुख अधिकाऱ्यांची नागभीड येथे बैठक घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, नागभीड- नागपूर या ब्रॉडगेज मार्गासाठी खासदार हंसराज अहीर, आमदार अतुल देशकर, आमदार सुधीर पारवे यांनी तर वडसा- गडचिरोली मार्गासाठी आमदार असताना सतत पाठपुरावा केला आणि मंजुरी मिळवून घेतली. पण मधल्या पाच वर्षात काँग्रेसच्या आमदार- खासदारांनी या दिशेने काहीच हालचाल केली नाही. त्यामुळे या मार्गाला गती मिळाली नाही. पण आता असे होणार नाही. या मार्गाला गती मिळावी यासाठी आपण नुकतीच रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांची भेट घेतली असून या मार्गाचे महत्व त्यांना पटवून देण्यात आले असून त्यांनीही या मार्गासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
खासदार नेते यांनी सांगितले की, ९ जुलै रेल्वे बजेट आहे. त्या अगोदरच ७ तारखेला आ. अतुल देशकर, आमदार सुधीर पारवे यांचे सोबत घेवून केंद्रातील हेवीवेट मंत्री नितीन गडकरी यांचे माध्यमातून आणखी रेल्वे मंत्र्यांशी भेट घेणार आहेत. आणि या दोन्ही मार्गाचा प्रश्न लावून धरणारा आहोत. यावेळी परिसरातील नागरिकांनी त्या-त्या भागातील विविध समस्या मांडल्या. यात प्रामुख्याने रेल्वे प्लाटफार्मची उंची वाढविणे, रेल्वेचे बोगदे तयार केले आहेत. त्यात सुधारणा करणे, आरक्षणाचा वेळ वाढविणे आदी विविध समस्यांचा यात समावेश होता. यावेळी ब्रह्मपुरीत आमदार अतुल देशकर, उमरेडचे आमदार सुधीर पारवे, वसंत वारजुकर, संजय गजपुरे, गजानन पाथोडे उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)