चंद्रपुरातील दीक्षाभूमीवर परिवर्तनपर्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 11:24 PM2017-10-15T23:24:56+5:302017-10-15T23:25:10+5:30

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तथागत गौतम बुद्धाच्या समतानिष्ठ विचारांना पुनर्जीवित केले. भारतीय संविधानाच्या माध्यमातून समस्त शोषितांना समता, स्वातंत्र्य, न्याय व बंधुतेच्या परिघात आणले.

Transformation Parade in Dikshitbhoombun in Chandrapur | चंद्रपुरातील दीक्षाभूमीवर परिवर्तनपर्व

चंद्रपुरातील दीक्षाभूमीवर परिवर्तनपर्व

Next
ठळक मुद्देधम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळा : धम्मज्योत प्रज्वलनाने उद्घाटन, लाखो बौद्ध बांधवांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तथागत गौतम बुद्धाच्या समतानिष्ठ विचारांना पुनर्जीवित केले. भारतीय संविधानाच्या माध्यमातून समस्त शोषितांना समता, स्वातंत्र्य, न्याय व बंधुतेच्या परिघात आणले. हजारो वर्षे दारिद्र्याच्या अंधारात खितपत पडलेल्या समाजाची अस्मिता जागृत केली. बुद्ध तत्त्वज्ञानाला समाजमनात रुजविण्याचे क्रांतीदर्शी कार्य बाबासाहेबांनी पूर्ण केले. या तत्त्वज्ञानातूनच जगात शांती नांदेल, असा आत्मविश्वास समाजमनात पेरण्यासाठी रविवारपासून चंद्रपुरात ६१ व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्याला प्रारंभ झाला आहे. भदंत डॉ. वण्णासामी (अरुणाचल प्रदेश) यांनी धम्मज्योत पेटवून तर पोलीस अधीक्षक नियती ठाकर व जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी हवेत फुगे सोडून धम्मसोहळ्याचे थाटात उद्घाटन केले.
कार्यक्रमाप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटीचे अध्यक्ष अरुण घोटेकर, स्वागताध्यक्ष मारोतराव खोब्रागडे, भदंत अनिरुद्ध महाथेरो, भदंत उत्तमो, भदंत ताझनियो, श्रद्धरक्ष्रित तसेच मेमोरीअल सोसायटीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. डॉ. वण्णासामी म्हणाले, बुद्ध तत्त्वज्ञानाने मानवी जीवनातील सर्व प्रकारच्या शोषणाचा प्रतिकार केला. जगभरातील सर्व दु:खांसाठी कार्यकारणभाव कारणीभूत असतो. त्यावर मार्ग काढल्यास आयुष्यात उजेड निर्माण होते. कोणत्याही दैवीशक्तीला अथवा अंधश्रद्धांना शरण जाण्याची आवश्यकता नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९५६ ला धर्मांतर करून लाखो शोषितांच्या जीवनात बदल घडवून आणले. जगातल्या अनेक समस्यांवर बौद्ध तत्त्वज्ञान पर्याय म्हणून स्वीकारल्या जात आहे. कारण विज्ञानवाद या तत्त्वज्ञानाचा मूळ पाया आहे, असेही त्यांनी नमूद केले. जिल्हाधिकारी आशुतोष सलिल म्हणाले, दीक्षाभूमीच्या विकासासाठी शासनाने निधी मंजूर केला. त्यामुळे प्रेरणाभूमी म्हणून या स्थळाचा विकास केला जाणार आहे. यावेळी पोलिस अधीक्षक नियती ठाकर यांनीही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याची गरज अधोरेखित केली. स्वागताध्यक्ष मारोतराव कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्ष अरुण घोटेकर यांनी दीक्षाभूमी परिसरात सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती प्रास्ताविक भाषणातून दिली.
सकाळी पाच वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून विश्वशांती, बंधुत्व प्रेरित वाहनासह शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. सायंकाळी साडेसहा वाजता धम्मज्योत प्रज्वलित करण्यात आली. अध्यस्थानी भदंत डॉ. वण्णासामी (अरुणाचल प्रदेश) तर विशेष पाहुणे म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती तसेच नागपूर दीक्षाभूमीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जून सुरई ससाई, मनपाचे आयुक्त संजय काकडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापडकर आदींनी धम्मज्योतीचे स्वागत केले. धम्मज्योतीचे दीक्षाभूमीवर आगमन झाल्यानंतर सामूहिक बुद्धवंदना व जागृतीगीते सादर करण्यात आली. कार्यक्रमाप्रसंगी भदंत अनिरुद्ध महाथेरो, भदंत मेतानंद महाथेरो, भदंत उत्तमो (म्यानमार), भदंत श्रद्धारक्षित, भदंत धम्मघोषमेत्ता आदींनी धम्म तत्त्वज्ञानावर बौद्ध बांधवांचे प्रबोधन केले. रात्री आठ वाजता मी भीमाची रमा ही नाटिका सादर करून रमाईच्या संघर्षमय जीवनाचा वेध घेण्यात आला. या नाटिकेने उपस्थितांना अंतर्मुख केले. या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र अस्थिंचे जतन केलेला कलश दर्शनार्थ ठेवण्यात आला आहे. थायलंड येथून आणलेल्या बुद्धमुर्तीचे दर्शन घेण्यासाठी बौद्ध अनुयायांनी प्रचंड गर्दी केली होती. श्रीलंकेतील बोधी वृक्षाच्या शाखेला आकर्षक रोषणाई आणि निळ्या पताकांनी सजविल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील दीक्षाभूमीचा परिसर तेजाने न्हावून निघाला आहे. सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील विविध संघटनांनी सामाजिक बांधीलकी म्हणून समाजोपयोगी उपक्रमांचे स्टॉल्स् लावले आहेत.
पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत आज समारोप
सोमवारी सायंकाळी पाच वाजता राज्याचे वित्त, वने, नियोजन तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत मुख्य समारंभ होणार आहे. यावेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, आमदार नाना शामकुळे, महापौर अंजली घोटेकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापडकर, महापालिकेचे आयुक्त संजय काकडे तसेच अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
आजचे प्रबोधनात्मक कार्यक्रम
सकाळी दहा वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिकलशाची शहरात मिरवणूक काढण्यात येणार आहे. दुपारी एक वाजता भदंत आर्य नागार्जून सुरई ससाई यांच्या अध्यक्षतेखाली धम्मप्रवचन होणार असून यामध्ये देश-विदेशातील बौद्ध तत्त्वज्ञानाचे अभ्यासक सहभागी होतील.

Web Title: Transformation Parade in Dikshitbhoombun in Chandrapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.