लॉकडाऊन काळात लोकसहभागातून टेकामांडवा शाळेचा कायापालट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:29 AM2021-02-16T04:29:32+5:302021-02-16T04:29:32+5:30
असा उपक्रम राबविणारी जिल्ह्यातील पहिलीच शाळा जिवती : संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातल्यामुळे शाळा बंद होती. पण शिक्षण ...
असा उपक्रम राबविणारी जिल्ह्यातील पहिलीच शाळा
जिवती : संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातल्यामुळे शाळा बंद होती. पण शिक्षण सुरू होते. या लॉकडाऊनच्या काळात चंद्रपूर जिल्ह्यातील जि.प. उ. प्रा. शाळा टेकामांडवा येथील शिक्षकवृंदानी ‘लोकसहभागातून शाळा विकासाकडे ’या उपक्रमास विशेष महत्त्व देत या काळात तब्बल एक लाखाचा भरीव लोकसहभाग निधी गोळा करून शाळेचा कायापालट केला आहे.
कदाचित लॉकडाऊन काळात एवढा भरीव निधी जमा करणारी ही पहिलीच जिल्हा परिषदेची शाळा असेल. अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या जिवती पंचायत समितीमधील टेकामांडवा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत १४० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. परंतु नेहमीच अपुऱ्या शिक्षक संख्येअभावी पालकांनीही या शाळेकडे पाठ फिरवली. परंतु त्या ठिकाणी नव्यानेच रुजू झालेल्या शिक्षक दीपक गोतावळे यांच्या संकल्पनेतून मुख्याध्यापक पवार यांच्या मार्गदर्शनात किसन बावने, दत्ता दोरे, रुपेश मांदाळे, उषा डोये, मुखळा मलेलवार या सर्व शिक्षकांनी परिश्रमाने हे उत्कृष्ट कार्य पूर्णत्वास नेले.
गावातील माजी विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व गावकऱ्यांनी शाळेच्या विकासासाठी आर्थिक योगदान दिले. सर्वांच्या सहकार्याने तब्बल एक लाख रुपयांचा निधी व काही वस्तू रुपाने दिलेली इतर मदत यातून शाळेची आकर्षक रंगरंगोटी व इतर कामे करण्यात आली आहेत. या शाळेला अजूनही मदतीचा ओघ सुरू आहे. येणाऱ्या काळात टेकामांडवा ही शाळा इतरांसाठी नक्कीच आदर्श मॉडेल ठरेल यात दुमत नाही.