कोळसा खाणीतून जळत्या कोळशाची वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2020 05:00 AM2020-10-25T05:00:00+5:302020-10-25T05:00:27+5:30
पोवनी -२ कोळसा खाणीतील कोल स्टॉकवरील लाखो रूपयांचा कोळसा मागील दोन दिवसांपासून जळत असून वेकोलिचे मोठे नुकसान होत आहे. याशिवाय येथे काम करणाऱ्या कामगारांनासुद्धा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अशातच या कोल स्टॉकवरील जळता कोळसा ट्रकमध्ये भरून रेल्वे साईडींगकडे नेला जात असून जळत्या कोळशाची अशी जीवघेणी वाहतूक सुरू आहे.
नितीन मुसळे।
लोकमत न्युज नेटवर्क
सास्ती : राजुरा तालुक्यातील वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्राअंतर्गत असलेल्या विविध कोळसा खाणीत कामगारांच्या सुरक्षिततेसाठी मोठा वाजागाजा करून सुरक्षिततेचे धडे दिल्या जात असले तरी या ठिकाणी होणा-या कामावरून वेकोलि प्रशासन सुरक्षिततेकडे कमालीचे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास पोवनी-२ या कोळसा खाणीतून सास्ती रेल्वे साईडींगकडे चक्क जळत्या कोळशाची ट्रकमधून वाहतूक केली जात होती. ही वाहतुक कामगारांच्या व परिसरातील नागरिकांच्या जीवाला धोठा ठरणारी आहे.
पोवनी -२ कोळसा खाणीतील कोल स्टॉकवरील लाखो रूपयांचा कोळसा मागील दोन दिवसांपासून जळत असून वेकोलिचे मोठे नुकसान होत आहे. याशिवाय येथे काम करणाऱ्या कामगारांनासुद्धा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अशातच या कोल स्टॉकवरील जळता कोळसा ट्रकमध्ये भरून रेल्वे साईडींगकडे नेला जात असून जळत्या कोळशाची अशी जीवघेणी वाहतूक सुरू आहे. पोवनी - २ कोळसा खाणीतून निघालेला कोळसा पोवनी -२ चे चेक पोस्ट, या मार्गावर असलेले पोवनी सब एरीया मॅनेजर यांच्या कार्यालयासमोरून गोवरी चेक पोस्ट पार करून जात असतानासुद्धा याकडे वेकोलि प्रशासनाने लक्ष दिले नाही. शुक्रवारी घडलेल्या या घटनेवरून हेच सिध्द होत आहे. आता याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
वेकोलिचे केवळ उत्पादनवाढीकडे लक्ष
वेकोलिच्या विविध कोळसा खाणीत मोठया उत्पादनाच्या हेतूने प्रशासन कामगारांच्याच नव्हे तर परिसरातील नागरिकांच्या जिवावर उठले असून कोणतीही सुरक्षितता न पाळता केवळ उत्पादन वाढीकडे लक्ष देत असल्याचे दिसून येत आहे. कोळसा खाण परिसरात होत असलेली कोळसा वाहतूक अत्यंत जीवघेणी असून ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा जास्त कोळसा भरला जातो. ट्रकांची भरधाव वाहतूक सुरू असते. यामुळे परिसरातील रस्त्यांची दैनावस्था तर झालीच आहे, याशिवाय रस्त्याने कोळसा सांडत जात असल्यामुळे रस्त्यावर कोळशाची धूळ पसरलेली असते. या परिसरातील मार्गावरून तालुक्यातील माथरा, गोवरी, पोवनी, चार्ली, निर्ली, कढोली, धिडशी, साखरी, वरोडा, चिंचोली या परिसरातील नागरिकांची व कोळसा खाणीत काम करणाºया कामगारांची मोठी रहदारी असते. त्यामुळे मार्गावरून होणारी कोळसा वाहतूक जीवघेणी ठरत असून धुळीमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
वेकोलिच्या कोळसा खाणीतून होणारी कोळसा वाहतूक ही नेहमीच जीवघेणी ठरत आहे. ओव्हरलोड वाहतुक, रस्त्याने भरधाव धावणारे ट्रक, रस्त्याच्या कडेला दोन्ही बाजूने असलेली अवैद्य पार्कीग, ट्रकमधून सांडणारा कोळसा व त्याची धूळ आणि आता जळता कोळसा, जनतेला धोकादायक ठरत आहे. दोषींवर कारवाई होणे आवश्यक आहे.
-अमोल घटे, माजी उपसरपंच, साखरी