परिवहन महामंडळाचे कर्मचारी वेतनाविना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 05:00 AM2020-09-29T05:00:00+5:302020-09-29T05:00:22+5:30
सात महिने वाहतूक बंद असल्याने कर्मचाºयांना टप्पाटप्यात वेतन देण्यात आले. त्यामुळे कर्मचाऱ्यांसमोर मोठी अडचण निर्माण झाली होती. थकीत असलेले वेतन कर्मचाऱ्यांना मिळाले. मात्र आता जुलै व आॅगस्ट या दोन महिन्यांचे वेतन अद्यापही झालेले नाही. दोन दिवसांनंतर सप्टेंबर महिना पूर्ण होणार आहे. तरीसुद्धा वेतन देण्यात आले नसल्याने त्याचे अर्थचक्र बिघडले आहे. त्यामुळे थकीत वेतन देण्यात यावे, अशी मागणी होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : टाळेबंदीचा सर्वात मोठा फटका बस महामंडळाला बसला आहे. शंभर टक्के तत्वावर बसफेऱ्या सुरु झाल्या असून प्रवाशांचा पाहीजे त्या प्रमाणात प्रतीसाद मिळत नसल्याने महामंडळाला आर्थिक फटका बसत आहे. परिणामी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे सप्टेंबर महिन्यांचे दोन दिवस शिल्लक असूनही मागील दोन महिन्यांपासूनचे वेतन अद्यापही मिळाले नाही. त्यामुळे ऐन लॉकडाऊनमध्ये कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोर जावे लागत आहे.
देशात कोरोनामुळे टाळेबंदी करण्यात आली. त्यामुळे आंतरजिल्हा व जिल्हाबाह्य बसफेऱ्या बंद करण्यात आल्या. सुमारे सात महिने बसफºया बंद असल्याने महामंडळाला मोठा फटका बसला. त्यामुळे प्राथमिक स्तरावर बसमधून मालवाहतूक सुरु करण्यात आली.
त्यानंतर ५० टक्के तत्वावर बससेवा सुरु करण्यात आली. परंतु, त्यालाही प्रवाशांकडून पाहीजे त्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला नाही. आता संपूर्ण बससेवा सुरु करण्यात आली आहे. परंतु, महामंडळाला अध्यापही उभारी आली नाही. परिणामी कर्मचाऱ्यांचे वेतन थकले आहे.
सात महिने वाहतूक बंद असल्याने कर्मचाºयांना टप्पाटप्यात वेतन देण्यात आले. त्यामुळे कर्मचाऱ्यांसमोर मोठी अडचण निर्माण झाली होती. थकीत असलेले वेतन कर्मचाऱ्यांना मिळाले. मात्र आता जुलै व आॅगस्ट या दोन महिन्यांचे वेतन अद्यापही झालेले नाही. दोन दिवसांनंतर सप्टेंबर महिना पूर्ण होणार आहे. तरीसुद्धा वेतन देण्यात आले नसल्याने त्याचे अर्थचक्र बिघडले आहे. त्यामुळे थकीत वेतन देण्यात यावे, अशी मागणी होत आहे.
जीव धोक्यात घालून बजावताहेत सेवा
बसमध्ये अनेक ठिकाणचे प्रवासी प्रवास करीत आहेत. तरीसुद्धा आपला जीव धोक्यात घालून बसचालक, वाहक प्रामाणिकपणे सेवा बजावत आहेत. मात्र त्यांच्या हक्काचे वेतन दोन महिन्यांपासून थकीत राहत असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे थकीत वेतन त्वरीत देण्यात यावे, अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून होत आहे.