ट्रॉमा केअर सेंटर आॅक्सिजनवर
By admin | Published: May 11, 2017 12:37 AM2017-05-11T00:37:59+5:302017-05-11T00:37:59+5:30
वरोरा शहराला औद्योगिक नगरी म्हणून नवीन ओळख निर्माण होत आहे. शहरात नेहमीच नागरिकांची व प्रवाशांची वर्दळ असते.
पदे अद्यापही रिक्तच : शासनाच्या उदासीनतेचे आणखी एक उदाहरण
लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : वरोरा शहराला औद्योगिक नगरी म्हणून नवीन ओळख निर्माण होत आहे. शहरात नेहमीच नागरिकांची व प्रवाशांची वर्दळ असते. त्यात चंद्रपूर-नागपूर हायवेही शहराला लागून गेला आहे. यामुळे अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. दुसरीकडे किरकोळ रुग्ण उपजिल्हा रुग्णालयात आला तरी ‘रेफर टू चंद्रपूर’ अशीच परिस्थिती आजही कायम आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून व मोठा गाजाबाजा करून बांधण्यात आलेले ‘ट्रॉमा केअर सेंटर’ शासनाच्या उदासीन धोरणामुळे अजूनही रुग्णांना वाकुल्या दाखवित आहे.
वरोरा शहर सर्व दृष्टीने परिसरातील गावांसाठी सोयीचे शहर आहे. नागपूर, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर व यवतमाळ या प्रमुख शहरांना जाण्यासाठीही वरोरा मार्ग सोयीचा आहे. त्यामुळे दररोज हजारो वाहने या मार्गाने जात असतात. परिसरात वाढलेली अपघाताची समस्या बघता शहरात ‘ट्रामा केअर सेंटर’ व्हावे म्हणून २०१० मध्ये प्रस्ताव सादर करण्यात आला होता. २०११ मध्ये कामाला सुरुवातही झाली आणि एक कोटी ४४ लाख ४२० रुपये खर्च करून भव्यदिव्य इमारत उभारण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून उपजिल्हा रुग्णालयाला २०१६ मध्ये हस्तांतरितही करण्यात आले. पण अजूनपर्यंत शासनाला ट्रामा केअर युनिटच्या लोकार्पणाचा मुहूर्त सापडत नाही आहे, हे विशेष . ट्रामा केअरसाठी एकूण १५ जागा भरण्याची मान्यता मिळाली आहे. पण अजून एकही जागा भरलेले नाही. त्यामुळे देखरेख करणार कोण, असा प्रश्न निर्माण होत असून इमारतीची दैनावस्था झाल्यावर शासनाला जाग येईल का, असा प्रश्नही आता नागरिकांकडून विचारला जात आहे.
इमारतीत भरतो मद्यपींचा मेळा
शहरात ट्रॉमा केअर सेंटरची इमारत बांधण्यात आली आहे. पण अद्याप या सेंटरसाठी एकही पद भरलेले नाही. साधा सुरक्षा रक्षकही नाही. त्यामुळे तळीरामांना आणि प्रेमीयुगुलांना ट्रॉमा केअर सेंटरची इमारत म्हणजे आयती पर्वणीच ठरत आहे. अंधार पडला की तळीरामांचा मेळाच भरत असल्याचे दिसून येते. परिसरात दारूच्या रिकाम्या बाटल्या, पाण्याचे रिकामे पाऊच पडलेले दिसतात.
साहित्य धूळखात
गेल्या काही महिन्यांपूर्वी ट्राम केअर युनीटसाठी साहित्य पाठविण्यात आले होते. मात्र युनीटमध्ये पदभरतीच करण्यात आली नाही. त्यामुळे केअर युनीटसाठी आलेले साहित्य सध्या उपजिल्हा रुग्णालयात धूळ खात आहे.
पदे मंजूर झाली आहेत. पण अद्याप भरण्यात आली नाहीत. याबाबत आपण वारंवार पाठपुरावा करीत आहोत. रुग्णांना योग्य उपचार मिळण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती होणे गरजेचे आहे. पदभरती झाल्यावर ट्राम केअर सेंटर सुरु होईल.
-बाळू धानोरकर,
आमदार वरोरा.