नादुरुस्त ट्रेलरला रुग्णवाहिकेची धडक; एक ठार, दोन जखमी
By admin | Published: March 8, 2017 12:41 AM2017-03-08T00:41:46+5:302017-03-08T00:41:46+5:30
स्वत:च्या रुग्णवाहीकेने आई व वडिलांना नागपुरातील खाजगी रुग्णालयात तपासणी करुन गावाकडे परत येत असताना अपघात घडला.
वरोरा : स्वत:च्या रुग्णवाहीकेने आई व वडिलांना नागपुरातील खाजगी रुग्णालयात तपासणी करुन गावाकडे परत येत असताना अपघात घडला. रस्त्याच्या कडेला नादुरुस्त ट्रेलरच्या बाजूला लावण्यात आलेल्या दगडाला रुग्णवाहीकेची धडक दिली. त्यात रुग्णवाहीका उलटल्याने आईचा जागीच मृत झाला. तर चालक असलेला मुलगा व त्याचे वडील गंभीररित्या जखमी झाले. सदर घटना नागपूर-चंद्रपूर मार्गावरील पिंपळगाव (शि.) गावानजीक सोमवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली.
लिलाबाई धर्मराव कांबळे (६५) रा. वणी असे मृत महिलेचे नाव असून रविंद्र धर्मराव कांबळे व धर्मराव कांबळे असे जखमींची नावे आहेत. वणी येथील वासेकर ले-आऊट मधील रहिवासी रविंद्र कांबळे हे स्वत:च्या एमएच- २९ टी- ३९१८ या क्रमांकाच्या रुग्णवाहीकेने आई व वडिलांना घेवून वैद्यकीय तपासणी करण्याकरिता नागपूरला गेले होते.
तपासणी पूर्ण झाल्यानंतर रुग्णवाहिकेने नागपूरवरुन वणीकडे परत येत असताना नागपूर-चंद्रपूर मार्गावरील पिंपळगाव (शि.) फाट्यानजीक एमएच- ४३ यू ९४५८ या क्रमांकाचा ट्रेलर नादुरुस्त असल्याने रस्त्याच्या कडेला उभा होता. ट्रेलरला कुठलेही लाईट लावले नव्हते त्यामुळे बाजूने दगड ठेवण्यात आले होते. या दगडाला रुग्णवाहीकेची धडक बसली. यात रूग्णवाहिका रस्त्याच्या कडेला उलटली. यात लिलाबाई कांबळे यांचा जागीच मृत्यू झाला. तर बाप-लेक गंभीररित्या जखमी झाले. (तालुका प्रतिनिधी)