जीव मुठीत घेऊन करावा लागतो प्रवाशांना प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2019 12:39 AM2019-07-28T00:39:08+5:302019-07-28T00:39:57+5:30
शिवाजी महाविद्यालयाजवळ सिमेंट कंपन्यासाठी रेल्वे गेट तयार करण्यात आला. मात्र सदर गेटमुळे दररोज हजारो प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अनेकवेळा विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे या रेल्वे गेटजवळ अंडरपास करण्याची मागणी माजी आमदार सुभाष धोटे यांनी रेल्वे मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
राजुरा : शिवाजी महाविद्यालयाजवळ सिमेंट कंपन्यासाठी रेल्वे गेट तयार करण्यात आला. मात्र सदर गेटमुळे दररोज हजारो प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अनेकवेळा विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे या रेल्वे गेटजवळ अंडरपास करण्याची मागणी माजी आमदार सुभाष धोटे यांनी रेल्वे मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सदर रेल्वे गेट दिवसातून १० ते १५ वेळा बंद होतो. विशेष म्हणजे, या रेल्वे गेटच्या पलीकडे अनेक शाळा, महाविद्याल आहे. त्यामुळे दररोज हजारो विद्यार्थी येथून ये-जा करतात. रेल्वे गेट बंद असते तेव्हा विद्यार्थ्यांसह वाहनांची मोठी गर्दी असते. आंध्रप्रदेशातून मोठ्या प्रमाणात लाकूड घेऊन ओव्हरलोड ट्रक येतात. या ट्रकमधील लाकूड रेल्वेगेटला लागून लाकूड खाली पडतात. त्यामुळे विद्यार्थी व नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. अनेकवेळा बांबू तसेच ओव्हरलोड लाकूड घेऊन ट्रक येत असल्यामुळे जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक होत असतानाही वाहतूक विभागाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे.
राजुरा शहरातून अवजड वाहने जात असून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा वाहनांवर वाहतूक शाखेने नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. मात्र त्यांचेही याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
अवैध वाहतूक जोमात
औद्योगिक शहर म्हणून ओळख असलेल्या राजुरा शहरामध्ये मोठ्या प्रमाणात अवैद्य वाहतूक सुरु आहे. मोठ्या प्रमाणात ओव्हरलोड वाहतूक केली जात आहे. विशेष म्हणजे, आंध्रप्रदेशची सिमा असल्यामुळे या राज्यातूनही येथे मोठ्या प्रमाणात अवैध व्यावसायिक रासरोसपणे येतात. यावर आळा घालणे गरजेचे झाले आहे.