गोंदोडा तपोभूमीची यात्रा प्रशासनाकडून उपेक्षित
By Admin | Published: December 31, 2014 11:22 PM2014-12-31T23:22:01+5:302014-12-31T23:22:01+5:30
बाल माणिक यांचे वास्तव्य तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची साधना असलेल्या गोंदोडा तपोभूमीत १९५९-६० पासून यात्रा महोत्सव पार पडत आहे. या यात्रा महोत्सवाला ५४ वर्षांची परंपरा आहे.
रमेश नान्ने - पेंढरी (कोके)
बाल माणिक यांचे वास्तव्य तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची साधना असलेल्या गोंदोडा तपोभूमीत १९५९-६० पासून यात्रा महोत्सव पार पडत आहे. या यात्रा महोत्सवाला ५४ वर्षांची परंपरा आहे. दरवर्षी येथे गुरुदेव भक्तांचा मेळा भरत असते. मात्रा पुरेशा सोईसुविधा येथे उपलब्ध नसल्याने गोंदोडा तपोभूमीची यात्रा, प्रशासनाकडून उपेक्षितच आहे.
राष्ट्रसंतानी त्यावेळेस सुरू केलेल्या यात्रेचे आताचे स्वरुप हे सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, बौद्धीक, कृषी, ग्रामगीता प्रचार व प्रसार, भजन स्पर्धा, कृषी मेळावे, आरोग्य मेळावे, पशु-मानव आरोग्य शिबिर, कीर्तन, प्रवचन, सामाजिक प्रबोधन व विविध स्पर्धा असा आहे.
यात्रेत समाज प्रबोधन, भजन, कीर्तन, सामुदायीक ध्यान, रामधून प्रार्थना, स्वच्छ भारत मिशन, ग्रामसफाई, आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी, अधिकारी, गुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी तथा महाराज गण यांचे मार्गदर्शन वेगवेगळ्या विषयांवर होत असते. तसेच शालेय विद्यार्थी, तरुण, महिलांठी व्हॉलीबॉल, स्लो-फास्ट सायकल रनिंग स्पर्धा, कबड्डी स्पर्धा, महिला तथा युवक मेळावे, व्यसनमुक्ती कार्यक्रम, सुसंस्कार शिबिर, कृषी मेळावे, रांगोळी स्पर्धा आदी उपक्रम होतात.
या कार्यात गावकरी, गुंफा यात्रा महोत्सव समिती, परिसरातील गुरुदेव सेवा मंडळ, गुरुदेव कार्यकर्ते, चिमूर तालुका प्रशासन, चिमूर-नेरी पोलीस स्टेशन, पंचायत समिती, जि.प. सदस्य, श्री गुरुदेव विद्यालय तथा ग्रामगीता आदिवासी आश्रम शाळेचे कर्मचारी-विद्यार्थी, शाळा समिती पदाधिकारी, जि.प. शाळा कर्मचारी-विद्यार्थी, सभोवतालच्या सर्व शाळेचे कर्मचारी, विद्यार्थी यांचा सिंहाचा वाटा असतो.
अशाप्रकारे हा यात्रा महोत्सव गेल्या ५४ वर्षांपासून अविरत सर्वांच्या सहकार्यातून अजूनही सुरू असल्याने परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण होत असते. राष्ट्रसंताची तपोभूमी गोंदेडा येथे महाराजांच्या मृत्यूनंतर यात्रेकरीता व वर्षभर तपोभूमीचे दर्शनासाठी अनेक जण येतात.