दिवाळीत रेल्वे प्रवास करताय... ‘तत्काळ’शिवाय पर्याय नाही !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2021 05:12 PM2021-10-19T17:12:58+5:302021-10-19T17:14:41+5:30
दिवाळी अगदी काही दिवसांवर आली आहे. नोकरी, शिक्षण, व्यावसायानिमित्त बाहेरगावी असलेले तसेच येथील प्रवासी गावी जाण्यासाठी रेल्वेचे तिकीट काढत आहे. मात्र विशेष ट्रेनचे आरक्षण फुल्ल होत असल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.
चंद्रपूर : कोरोना संकटामुळे मागील दीड वर्षांपासून पॅसेंजर बंद आहे. विशेष रेल्वे सुरू आहे. मात्र त्याचे भाडे अतिरिक्त असल्यामुळे प्रवाशांना नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे. कोरोनाची लोट आता ओसरत असल्यामुळे प्रवाशी पर्यटन तसेच इतर ठिकाणी जाण्याचे नियोजन करीत आहेत. मात्र रेल्वेचे तिकीटही वेटिंग येत असल्याने अनेकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
दिवाळी अगदी काही दिवसांवर आली आहे. नोकरी, शिक्षण, व्यावसायानिमित्त बाहेरगावी असलेले तसेच येथील प्रवासी गावी जाण्यासाठी रेल्वेचे तिकीट काढत आहे. मात्र विशेष ट्रेनचे आरक्षण फुल्ल होत असल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे पॅसेंजरसह नियमित ट्रेन सुरू करण्याची मागणी केली जात आहे.
मुंबई मार्गावरील आरक्षण फुल्ल
दिवाळी अगदी काही दिवसांवर आली आहे. त्यामुळे प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या दिवसामध्ये रेल्वेचे आरक्षण फुल्ल होत आहे. काही जणांचे आरक्षण वेटिंगवरसुद्धा येत आहेत. मुंबई मार्गावरील रेल्वेचे आरक्षण आगामी काही दिवसांत फुल्ल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पॅसेंजर एक्स्प्रेस कधी सुरू होणार
रेल्वेच्या काही विभागांमध्ये पॅसेंजर रेल्वे सुरु करण्यात आल्या आहे. मध्य रेल्वेमध्ये मात्र प्रवाशांना वाट बघावी लागत आहे. पॅसेंजरअभावी दररोज अप-डाऊन करणाऱ्या प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. किमान पॅसेंजर सुरु करून दिलासा देणे गरजेचे आहे.
सध्या सुरू असलेल्या एक्स्प्रेस
नवजीवन
दक्षिण
केरला
दानापूर
तामिलनाडू
तेलंगणा
नंदीग्राम
जीटी
अधिक तिकीटदर मोजण्याची वेळ
कोरोना संकटकाळापासून विशेष रेल्वे सुरू आहे. त्यामुळे तिकिटांसाठी अधिक पैसे मोजावे लागत आहे. जवळच्या ठिकाणी जायचे असेल तरीही अतिरिक्त पैसे मोजून तिकीट घ्यावे लागत आहे. त्यामुळे सामान्य प्रवाशांच्या खिशाला आर्थिक ताण सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, आरक्षण असल्यामुळे अतिरिक्त प्रवाशांना तिकीटही मिळत नाही. त्यामुळे अनेकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
रेल्वे विभाग केवळ विशेष ट्रेन चालवत आहे. त्यामुळे सामान्य प्रवाशांचे बेहाल सुरू आहे. हा प्रकार केवळ मध्य रेल्वे नागपूर डिविजनमध्ये सुरू आहे. चंद्रपूर-बल्लारपूर येथील प्रवाशांना मुंबईला जाण्यासाठी वर्धा-सेवाग्राम येथून ट्रेन पकडावी लागते. दररोज नाही तर किमान आठवड्यातून दोन दिवस तरी मुंबईसाठी ट्रेन द्यावी, पॅसेंजरही बंद आहे. त्यामुळे प्रवाशांचे बेहाल सुरू आहे. याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे.
- श्रीनिवास सुंचूवार, झेडआरयू सदस्य,
मध्य रेल्वे मुंबई