ट्रॅव्हल्स नाल्यात कोसळली; महिला ठार, चाैघे गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2023 09:19 PM2023-05-13T21:19:28+5:302023-05-13T21:19:51+5:30

Chandrapur News राजुरा येथून नांदगाव घोसरीकडे बल्लारपूर किन्ही मार्गे जाणारी लेक्कलवार ट्रॅव्हल्स ही किन्हीच्या नाल्यात कोसळली. यात एका महिलेचा मृत्यू झाला, तर अन्य चारजण गंभीर जखमी झाले.

Travels crashed into the drain; Woman killed, four seriously | ट्रॅव्हल्स नाल्यात कोसळली; महिला ठार, चाैघे गंभीर

ट्रॅव्हल्स नाल्यात कोसळली; महिला ठार, चाैघे गंभीर

googlenewsNext

चंद्रपूर: राजुरा येथून नांदगाव घोसरीकडे बल्लारपूर किन्ही मार्गे जाणारी लेक्कलवार ट्रॅव्हल्स ही किन्हीच्या नाल्यात कोसळली. यात एका महिलेचा मृत्यू झाला, तर अन्य चारजण गंभीर जखमी झाले. ही घटना शुक्रवारी रात्री ९:३० वाजण्याच्या सुमारास घडली. जखमींना उपचारासाठी चंद्रपूर येथील शासकीय वैैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. याशिवाय २३ किरकोळ जखमींना डिस्चार्ज देण्यात आला आहे. घटनास्थळावरून चालक पसार झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

ट्रॅव्हल्स नाल्यात उलटताच वऱ्हाड्यांची आरडाओरड ऐकून किन्हीचे पोलिस पाटील अरुण बुचे व नागरिक घटनास्थळी धावून गेले. लगेच बल्लारपूर पोलिसांना अपघाताची सूचना देण्यात आली. सपोनि शैलेंद्र ठाकरे, सहायक फौजदार धनंजय गिनलवार, वाहतूक शिपाई दिनकर पोले, हवालदार अनिल झाडे तत्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जखमींना उपचारासाठी दवाखान्यात हलवले. या अपघातात नांदगाव घोसरी येथील सुनंदा हरिदास मडावी (वय ५०) यांचा मृत्यू झाला, तर समीर संतोष बावणे (२५, रा. चिमटा, मूल), दामोदर हजारे (४६), कविता (४५), मीराबाई कामटकर (६३) हे गंभीर जखमी झालेत. त्यांना चंद्रपूर येथे भरती करण्यात आले आहे. बसचा चालक स्नेहल मडावी (रा. जुनासुर्ला) हा घटनेनंतर फरार झाला. पुढील तपास बल्लारपूर पोलिस करीत आहेत.

एक बस फेल, दुसरी कोसळली नाल्यात...

राजुरा येथे लग्नसोहळा आटोपून वऱ्हाडी एका बसने मूल तालुक्यातील नांदगाव घोसरीकडे जाण्यास निघाले असता ती बस नादुरुस्त झाली. त्यामुळे या बसमधील ५० च्या जवळपास वऱ्हाडी पोंभुर्णा येथील लेक्कलवार ट्रॅव्हल्समध्ये (एम.एच ३४ ए.बी ८०७५) बसले. वऱ्हाड्यांना घेऊन ट्रॅव्हल्स नांदगाव घोसरीकडे जाण्यास निघाली असता बल्लारपूर तालुक्यातील किन्ही नाल्याजवळील वळणावर बसचालकाचे नियंत्रण सुटले आणि अनर्थ घडला.

Web Title: Travels crashed into the drain; Woman killed, four seriously

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात