१३१ कोरोना रूग्णांवर खासगी हॉस्पिलटमध्ये उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 05:00 AM2020-09-16T05:00:00+5:302020-09-16T05:00:28+5:30
प्रचलित मार्गदर्शक सुचनेनुसार प्रतिबंधित कालावधीमध्ये रूग्णांना वैद्यकीयदृष्टया लक्षणानुसार लक्षण नसलेले, सौम्य किंवा अतिसौम्य लक्षणे, मध्यम तीव्र लक्षणे व तीव्र्र लक्षणांमध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे. त्यानुसार रूग्णांना अनुक्रमे कोविड केअर सेंटर (सीसीसी), डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर (डीसीएच) व डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल (डीसीएच) मध्ये उपचारासाठी दाखल करता येणार आहे.
लोकमत न्युज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोनाचे रूग्ण वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये कोरोना रूग्णांवर उपचार सुरू झाले आहे. मंगळवारपर्यंत सहा हॉस्पिटलमध्ये १३१ रूग्णांवर उपचार सुरू होते. रूग्णसंख्या लक्षात घेवून प्रशासनाने वन अकादमीतील बेडस्चा विस्तार केल्याने मंगळवारपर्यंत २३४ तर सैनिकी शाळेत १९१ रूग्ण उपचार घेत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
केंद्र सरकारच्या ७ एप्रिल २०२० रोजी कोविड १९ संशयित व पॉझिटिव्ह रूग्णांसाठीच्या योग्य व्यवस्थापनासाठी मार्गदर्शन तत्त्वे जारी केले. प्रचलित मार्गदर्शक सुचनेनुसार प्रतिबंधित कालावधीमध्ये रूग्णांना वैद्यकीयदृष्टया लक्षणानुसार लक्षण नसलेले, सौम्य किंवा अतिसौम्य लक्षणे, मध्यम तीव्र लक्षणे व तीव्र्र लक्षणांमध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे. त्यानुसार रूग्णांना अनुक्रमे कोविड केअर सेंटर (सीसीसी), डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर (डीसीएच) व डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल (डीसीएच) मध्ये उपचारासाठी दाखल करता येणार आहे. अतिसौम्य किंवा लक्षणे नसलेल्या कोविड पॉझिटिव्ह रूग्णांना जर त्यांच्या घरातच योग्यप्रकारे सुविधा असतील तर त्यांच्या संमतीनुसार घरीच विलगीकरणाचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला. त्यासाठी शासनाने अटी निश्चित केल्या आहेत. अटींची पुर्तता केली तरच गृह विलगीकरणाचा पर्याय उपलब्ध करून दिला जातो. जिल्हा प्रशासनाने कोरोना प्रतिबंधासाठी विविध उपाययोजना केल्या. मात्र, रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असल्याने दिसून येत आहेत. महिनाअखेरपर्यंत अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या २० हजार होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने खासगी डॉक्टरांनी स्वत:च्या हॉस्पिटल्समध्ये रूग्णांवर उपचार करण्यासाठी यादी जारी केली. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने २० मे २०२० रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार उपचारावरील शुल्क रूग्णांना द्यावा लागणार आहे.
चंद्रपुरातील खासगी हॉस्पिटल्स
कोविड हेल्थ केअर्ससाठी स्पंदन हॉस्पिटल, बुक्कावार हार्ट अॅण्ड क्रिटीकल केअर हॉस्पिटल, पंत हॉस्पिटल, श्वेता हॉस्पिटल, क्राईस्ट हॉस्पिटल, वासाडे नर्सिंग होम, बेंदले हॉस्पिटलचा समावेश आहे. याशिवाय डिसीएच हॉस्पिटल, क्राईस्ट हॉस्पिटल १, मानवटकर हॉस्पिटल, शिवजी हॉस्पिटल (पेड्रियाट्रिक), मेहरा हॉस्पिटल, आस्था हॉस्पिटल, सैनानी हॉस्पिटल, नगराळे हॉस्पिटल, गुरूकृपा मनोलक्ष्मी नर्सिंग होम व गुलवाडे (एनसी मदरर्स) आदी हॉस्पिटल्सचा समावेश करण्यात आला आहे.
आठ तालुक्यातच कोविड केअर सेंटर
भद्रावती, चिमूर, ब्रह्मपुरी, पोंभुर्णा, वरोरा, गोंडपिपरी, सिंदेवाही, नागभीड व सावली येथे कोव्हीड केअर सेंटर सुरू करण्यात आले. यामध्ये रूग्णांवर उपचार सुरू आहे. याकरिता प्रशासनाने अत्यावश्यक बेड्स, आॅक्सिजन व अन्य सुविधा पुरविल्या आहेत. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय ७२ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. पोलीस विभागाच्या एका इमारतीतही कोविड केअर सेंटर असून ३८ रूग्णांवर उपचार केले जात आहे.
रूग्णांसाठी २५ संस्था निश्चित
कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेवून जिल्हा प्रशासनाने २५ संस्था निश्चित करण्यात आल्या आहेत. या यादीत डॉ. बेंदले हॉस्पिटल्सचे नाव आहे. मात्र, मंगळवारपर्यंतच्या आरोग्य विभागाच्या अहवालानुसार रूग्णालयात कोरोनाचा एकही रूग्ण दाखल झाला नव्हता. यादीमध्ये शासकीय कारागृहाचाही समावेश आहे
खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्या रूग्णांवर शासनाने निश्चित केलेल्या दरानुसारच उपचार करणे बंधनकारक आहे. जनरल वार्ड बेड चार्जेस, आयुसीयू बेड, आयसीयु व व्हेंटीलेटर चार्जेसही शासनाने ठरवून दिले. त्यामुळे रूग्णांनी जिल्हा व मनपा प्रशासनाने सुरू केलेल्या विविध कक्षांमधून माहिती घेवूनच शुल्क अदा करावे.
- राजेश मोहिते, आयुक्त मनपा,चंद्रपूर