आरोग्य केंद्रातील खाटांअभावी रूग्णांंवर खालीच होतो उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2020 06:00 AM2020-02-02T06:00:00+5:302020-02-02T06:00:43+5:30
राजुरा तालुक्यातील देवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात मागील काही महिन्यांपासून मूलभूत सोयीसुविधाचा अभाव आहे. रूग्णांना वेळेवर उपचार मिळत नाही, असा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. याबाबत नागरिकांनी आरोग्य विभागाकडे तक्रारी केल्या होत्या. परंतु काही उपयोग झाला नाही, असेही गावकऱ्यांचे म्हणणे आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
देवाडा : आरोग्य प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे देवाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रूग्णांना खाटांअभावी जमिनीवरच उपचार सुरू असल्याचे दिसून येत आहे. हा प्रकार असाच सुरू राहिला तर रूग्णांचे जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही समस्या सोडविण्याची मागणी रूग्णांचे कुटुंबीय व नागरिकांनी केली आहे.
राजुरा तालुक्यातील देवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात मागील काही महिन्यांपासून मूलभूत सोयीसुविधाचा अभाव आहे. रूग्णांना वेळेवर उपचार मिळत नाही, असा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. याबाबत नागरिकांनी आरोग्य विभागाकडे तक्रारी केल्या होत्या. परंतु काही उपयोग झाला नाही, असेही गावकऱ्यांचे म्हणणे आहे. रूग्णालय परिसराची नियमित स्वच्छता केली जात नाही. त्यामुळे रूग्णांना प्रचंड त्रास होतो. कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी येणाऱ्या महिलांना नाईलाजाने जमिनीवर झोपावे लागत आहे. आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रूग्णांना सौजन्याची वागणूक देत नाही, असा आरोप रूग्णांचे नातेवाईक व नागरिकांनी केला आहे.
आरोग्य केंद्रात साप घुसल्याने तारांबळ
देवाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साचला. झाडेझुडपे वाढल्याने परिसरात सापांचा संचार सुरू झाला आहे. मंगळवारी रात्री आरोग्य केंद्रातील रूग्णांच्या एका खोलीत अचानक साप आल्याने महिला रूग्णांची तारांबळ उडाली. मात्र रूग्णांना जीव वाचविण्यासाठी खाटावरून उठावे लागले. दरम्यान, काहींनी हिंमत करून सापाला उसकावून लावल्यो पुढील अनर्थ टळल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली.
कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणाऱ्या रूग्णांच्या नातेवाईकांनी समस्यांबाबत माहिती दिली. रूग्णांना कोणत्याही अडचणी येऊ नये, याबाबत सूचना दिल्या. लगेच तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनाही आरोग्य केंद्रात बोलावले.
- मुमताज जावेद अब्दुल, सभापती पंचायत समिती, राजुरा
आरोग्य केंद्रातील एक वैद्यकीय अधिकारी २० दिवसांपासून रजेवर आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रा वर्ग चार श्रेणीच्या कर्मचाऱ्यांबाबत तक्रारी आहे. त्यांच्याविरूद्ध कारवाई करू.
- प्रकाश नगराळे, तालुका आरोग्य अधिकारी, राजुरा