अन् दुर्धर आजारग्रस्त महिलेवर मुंबईत उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 11:38 PM2017-10-27T23:38:53+5:302017-10-27T23:39:12+5:30
दुर्धर आजाराने पीडित असलेल्या निशा मैती या महिलेस आमदार बाळू धानोरकर यांनी एक लाखाची मदत करून सामाजिक बांधिलकी जोपासली़ ‘लोकमत’ने निशा मैती यांची व्यथा जनतेसमोर मांडली होती़ ....
लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : दुर्धर आजाराने पीडित असलेल्या निशा मैती या महिलेस आमदार बाळू धानोरकर यांनी एक लाखाची मदत करून सामाजिक बांधिलकी जोपासली़ ‘लोकमत’ने निशा मैती यांची व्यथा जनतेसमोर मांडली होती़ त्यामुळे छापा ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी पाठपुरावा केला होता़ पीडित महिलेवर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू आहे़
निशा मैती यांना बोनम्यारो फेल्युअर नावाचा आजार झाला आहे़ आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने छावा ग्रुप व एक हाथ मदतीचा या समितीने प्रयत्न सुरू केले़ विशेष म्हणजे लोकमतने वृत्त प्रकाशित करून नागरिक अथवा लोकप्रतिनिधींनी मदत करावे,़ असे आवाहन केले होते़ परिणामी, २ महिन्यापूर्वी मुंबई येथे झालेल्या बैठकीत आमदार बाळू धानोरकर यांनी १ लाखाची मदत जाहीर केली होती़ दिवाळीत त्या आजारग्रस्त बहिणीला भाऊबीज ओवाळणीच्या स्वरूपात १ लाखाची मदत बँकेच्या खात्यात जमा केली़
काही महिन्यापूर्वी गावातून मदत रॅली काढून युवकांनी निधी गोळा केला़ सामाजिक कार्यकर्ते अधिकारी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांनी मदत केली़ परंतु, त्यातून उपचार करणे कठीण झाले होते़ दरम्यान, मुख्यमंत्री सहाय्य्यता निधीतून उपचारासाठी मदत करून असेही काहींनी आश्वासन दिले होते़ त्यामुळे आयोजन समितीचे सदस्य ओम चावरे , दीपक गोंडे , तुषार कडू रवी पाटील यांनी मुंबई गाठली़ मंत्रालयाच्या चकरा मारूनही निराशा वाट्याला आली होती़
अखेरचा पर्याय म्हणून आ. धानोरकर यांच्याकडे मदतीची मागणी करण्यात आली असता एक लाख रुपये देण्याचे मान्य केले़ शिवाय ऐन भाऊबीज सणाला निशा मैती यांच्या बँकेच्या खात्यात रक्कम जमा करून आश्वासन पाळले़