मुदतबाह्य सलाईनद्वारे रूग्णांवर उपचार
By admin | Published: April 8, 2015 12:00 AM2015-04-08T00:00:54+5:302015-04-08T00:00:54+5:30
येथील ग्रामीण रुग्णालयात विविध आजारांवर उपचार घेण्यासाठी दाखल झालेल्या रुग्णांना उपचारादरम्यान मुदतबाह्य सलाईन दिल्याचा प्रकार रविवारी उघडकिस आला....
ब्रह्मपुरीतील प्रकार : वरिष्ठ अधिकारी अनभिज्ञ
ब्रह्मपुरी : येथील ग्रामीण रुग्णालयात विविध आजारांवर उपचार घेण्यासाठी दाखल झालेल्या रुग्णांना उपचारादरम्यान मुदतबाह्य सलाईन दिल्याचा प्रकार रविवारी उघडकिस आला. या प्रकारामुळे रुग्णांच्या सुरक्षिततेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे.
ब्रह्मपुरी शहरात विविध वैद्यकीय सुविधा लक्षात असल्याने आरोग्य नगरी म्हणून शहर प्रसिद्ध आहे. शहरात अनेक मोठमोठी खासगी रुग्णालये असली तरी सर्वसामान्य नागरीक ग्रामीण रुग्णालयाचा आधार घेतात. हक्काचे रुग्णालय म्हणून ग्रामीण भागातील जनता या रुग्णालयात उपचारासाठी येतात. चौगान येथील लताबाई लवकुश चंदनबावणे या महिलेला रविवारी ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कर्तव्यावर असलेल्या परिचारिकेने त्यांना सलाईन लावले. सलाईन लावल्याच्या काही वेळातच लताबाईला अस्वस्थता वाटू लागली. दरम्यान त्याच वॉर्डातील बाजूच्या खाटेवर असलेल्या रुग्णाची मुलगी वडिलांना बघायला आली, तिने वडिलांना लावण्यात आलेल्या सलाईनवरील छापील दिनांक बघितला असता, मुदतबाह्य सलाईन लावल्याचे लक्षात आले. तिने लगेच इतर रुग्णांचे सलाईन बघितले ते सुद्धा कालबाह्य असल्याचे दिसून आले.
यावेळी कर्तव्यावर असलेल्या परिचारिकेच्या लक्षात ही बाब येताच तिने सर्व रुग्णांचे सलाईन काढून घेतल्या. लताबाई यांची सलीन वेळीच काढल्यामुळे त्यांचे प्राण बचावले.
हा प्रकार गंभीर असल्यामुळे उपस्थित रुग्णांच्या नातेवाईकांनी ६ एप्रिलला ब्रह्मपुरी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. खंडाळे व तहसीलदार वानखेडे यांच्याकडे लेखी तक्रार देऊन बेजबाबदार कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. तसेच कर्तव्यावर असलेल्या परिचारिकेने कालबाह्य सलाईन काढल्यानंतर सर्व रुग्णांच्या बळजबरीने केसपेपर असलेल्या फाईलवरील कोऱ्या कागदांवर स्वाक्षऱ्या घेतल्या असल्याचे रुग्णांच्या नातेवाईकांनी तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणामुळे ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या प्रकरणात दोषी कर्मचाऱ्यांवर वैद्यकीय अधीक्षक काय कारवाई करतात, याकडे लक्ष लागले आहे. (तालुका प्रतिनिधी)