वृक्षलागवडीत फळझाडांवर भर आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2017 12:39 AM2017-06-23T00:39:02+5:302017-06-23T00:39:02+5:30

वन्यप्राणी व मानव संघर्ष दिवसेंदिवस वाढीस लागला आहे. जंगलातील फळझाडे पूर्णत: नष्ट झाली आहेत.

Tree trees need more emphasis on fruit trees | वृक्षलागवडीत फळझाडांवर भर आवश्यक

वृक्षलागवडीत फळझाडांवर भर आवश्यक

Next

चार कोटी वृक्षलागवड : मानव-वन्यजीव संघर्षावर करता येईल मात
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : वन्यप्राणी व मानव संघर्ष दिवसेंदिवस वाढीस लागला आहे. जंगलातील फळझाडे पूर्णत: नष्ट झाली आहेत. त्यामुळे जंगलातील प्राणी गावाच्या दिशेने येत आहेत. सध्या चार कोटी वृक्षलागवडीची धडक मोहीम हाती घेण्यात येत आहे. या मोहिमेमध्ये वन्यप्राण्यांसाठी जंगलांत मोठ्या प्रमाणात फळवर्गीय झाडांची लागवड करणे अत्यावश्यक आहे.
मानव आणि वन्यप्राणी यांच्यातील संघर्ष थांबवून पर्यावरणाचा समतोल राखायचा असेल तर जंगलामध्ये फळवर्गीय झाडांची लागवड करणे अगत्याचे झाले आहे. फक्त झाडे लावूनच होणार नाही. तर त्यांची जोपासनाही योग्य पद्धतीने करून किमान पाच ते दहा वर्षापर्यंत संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारावी लागणार आहे.
वन विभागाने मागील अनेक वर्षांपासून केवळ इमारती लाकूड मिळविण्याच्या दृष्टीनेच झाडांची लागवड केली आहे. त्यात सागवन, सिसम, बिजा यासारख्या झाडांचा समावेश आहे. डुकरांसाठी कंद-मुळे, हरीण आणि इतर प्राण्यांसाठी पालावर्गीय झाडे लागवडीची नितांत आवश्यकता आहे.
राज्याचे वनमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चार कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. त्या दृष्टीने प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. त्यात इमारती लाकूड मिळणाऱ्या झाडांची संख्या अधिक आहे. मात्र जंगलातील फळवर्गीय झाडांची संख्या वाढविण्यासाठी शासन स्तरावर प्रशासकीय यंत्रणेला पुढाकार घेण्याची आवश्यकता निर्माण झाली. शासनाने वनविभाग, वनविकास महामंडळ, सामाजिक वनीकरण विभाग या सारख्या यंत्रणेकडे वृक्ष लागवडीची जबाबदारी दिली असली तरी या सत्रापासून शासनाच्या बहुतेक सर्वच विभागाला वृक्ष लागवडीची सक्ती केली आहे. शिवाय प्रत्येक व्यक्तीने किमान पाच झाडे तरी जागा मिळेल तिथे लावावी, असे निर्देश जारी केले असल्याचे बोलले जात आहे.
वन्यप्राणी व मानव संघर्ष टाळण्यासाठी जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने फळवर्गीय झाडांचीच लागवड करावी. या देशातील प्रत्येक नागरिकाने किमान पाच झाडे लावून व त्याची योग्य निगा राखून पर्यावरणाच्या सुरक्षिततेला हातभार लावावा.
जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी फळवर्गीय झाडांच्या लागवडीसाठी आग्रही असावे, असेही तज्ज्ञांकडून बोलले जात आहे.

हिंस्र प्राण्यांचे गावाकडे आगमन
जंगलामध्ये फळवर्गीय झाडांची कमतरता असल्याने जंगलात राहणारे माकड, हरीण, डुक्कर यासारखे प्राणी गावाकडे, शेताकडे येऊन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत असतात. माकडांच्या हैदोसाने गावातील फळझाडांचेही नुकसान होत आहे. हे प्राणी वाघ, बिबट या सारख्या हिंस्त्र प्राण्यांचे भक्ष्य आहेत. हरीण, डुक्कर आदी प्राणी गावाकडे आले की, त्या भक्ष्यांचा मागोवा घेत वाघ आणि बिबट यासारखे हिंस्र प्राणीदेखील गावाच्या दिशेने येवून गावात दहशत निर्माण करीत आहेत. पर्यायाने वन्यप्राणी व मानव संघर्ष वाढीला लागला आहे.

Web Title: Tree trees need more emphasis on fruit trees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.