पारंपरिक पद्धतीने साजरी केली आदिवासी बांधवांनी दिवाळी; अख्खे गाव सजले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2022 09:48 PM2022-10-25T21:48:52+5:302022-10-25T21:49:20+5:30
चंद्रपूर तालुक्यात ग्रामीण भागात जवळपास ७५ ते ८० आदिवासी गुड्या-पाड्यासह येल्लापूर येथे भोगीच्या दिवशी दिवाळी दंडार उत्सवाची मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली.
दीपक साबने
चंद्रपूर: तालुक्यात ग्रामीण भागात जवळपास ७५ ते ८० आदिवासी गुड्या-पाड्यासह येल्लापूर येथे भोगीच्या दिवशी दिवाळी दंडार उत्सवाची मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली. आणि दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी येल्लापूर येथे आदिवासी बांधव भगिनींनी नवीन कपडे परिधान करून पूजा अर्चा करून गायगोंदन साजरा करण्यात आला. यावेळी दंडार देव घरचे, कर्णु कुमरे, जगेराव पेंदोर, गावपाटील, सोनेराव पेंदोर व समस्त आदिवासी बांधव उपस्थित होते.
आदिवासी बांधवांनी सकाळी उठून गावातील प्रत्येक गुरांना रंगवून, सजवून गायगोंदन करण्यात आले. त्यांची अगरबत्ती लावून, नारळ फोडून पूजा करण्यात आली. दिवाळी सणानिमित्त घरी खाण्यासाठी बनवलेले पदार्थ नैवेद्य सुपात घेऊन गायींना चारण्यात आले. तसेच गावातील प्रत्येक घरी जाऊन गुरांची पूजा केली. त्यानंतर गाव पाटलाच्या घरी सर्वजण एकत्र जमून गावातील सर्व गुराखी यांना एकत्र बसवून मानासन्मानाने कपडे अहेर करण्यात आले. विशेष म्हणजे गावातील सर्व महिलांनी नवीन कपडे परिधान करूनच गायगोंदनची पूजा अर्चा करतात.
फरा, घुमेला, वेटटे कोळाल, कैसार कोला स्त्रियांसाठी देवतेच्या रूपात मानली जाते. यामध्ये चार देव सगाजनांचे घुमेला, पाच देवे सगाजनांचे फरा, सहा देव सगाबांधवांचे कोडाल, सात देवे सगाजनांचे टपाल अशी देवांची वितरण व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्वांची नव्याने निर्मिती करत असताना मातृशक्तीला खूप मोठे महत्त्व दिलेले आहे. त्यामुळे दिवाळी या सणानिमित्त या उत्सवांमध्ये मासिक पाळी असलेल्या स्त्रीला सुद्धा कोणतेही बंधन नसते. असे आदिवासी समाजातील जाणकार व वरिष्ठांचे म्हणणे आहे.