आदिवासी कोलाम पुराव्याअभावी जात प्रमाणपत्रापासून वंचित
By admin | Published: August 30, 2014 01:19 AM2014-08-30T01:19:16+5:302014-08-30T01:19:16+5:30
राजुरा तालुक्यातील घोट्टा, कोलामगुडा (मूर्ती), बापूनगर, लाईनगुडा, पिपळगुडा येथे आदिवासी कोलाम बांधवांचे बऱ्याच वर्षांपासून वास्तव्य आहे.
राजुरा : राजुरा तालुक्यातील घोट्टा, कोलामगुडा (मूर्ती), बापूनगर, लाईनगुडा, पिपळगुडा येथे आदिवासी कोलाम बांधवांचे बऱ्याच वर्षांपासून वास्तव्य आहे. हे कोलाम बांधव महसूल व वन विभागाच्या जमिनीवर अतिक्रमण करुन शेती करीत आहे. परंतु शासकीय रेकॉर्डवर त्यांचे वास्तव्य अतिक्रमण न दाखविल्यामुळे त्यांना पुराव्याअभावी जातीचे प्रमाणपत्र मिळणे अवघड झाले आहे. त्याचा परिणाम वनहक्काचे पट्टे, शासनाच्या योजनांचा लाभ व शैक्षणिक सवलतींपासून मुकावे लागण्याची पाळी आली आहे.
या तालुक्यातील दुर्गम व मागासलेल्या जंगल परिसरात सुमारे ४०-५० वर्र्षांपासून घोट्टा, बापूनगर, लाईनगुडा, पिंपळगुडा येथे आदिवासी कोलामांचे वास्तव्य आहे. शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून शेती करणे तसेच जंगलातील बांबूपासून तट्टे, ताटवे, सुप, टोपली तयार करणे हा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे. परिसरातील बाजारात नेवून या तट्टे ताटव्यांची विक्री करून त्यातून मिळणाऱ्या पैशातून तेल, मिठ या आवश्यक वस्तुंची खरेदी करुन हे आदिवासी बांधव जीवन जगत आहेत. त्दुर्गम जंगलात वास्तव्य हिच त्यांची जगण्याची पद्धत आहे. त्यामुळे शासन दरबारी वास्तव्याचा पुरावा नाही. त्यामुळे घोट्टा येथील अनेकांनी जातीच्या प्रमाणपत्रासाठी राजुरा तहसीलदारांकडे कागदपत्रासह ६ जानेवारीला निवेदन सादर केले. आतापावेतो २५ वेळा चकरा मारल्या. मात्र आता सन १९५० च्या पुराव्याची मागणी केली जात आहे. कागदपत्रांची चौकशी करुन सिडाम, आत्राम, कुमरे ही आडनावे आदिवासीमध्ये मोडत असल्यामुळे यावर त्वरित तोडगा काढण्याची विनंती पीडित कोलाम बांधवांनी केली आहे.(तालुका प्रतिनिधी)